scorecardresearch

Premium

तेलंगणचा काँग्रेसला ‘हात’; बीआरएसची हॅट्ट्रिक हुकली

भाजपच्या जागांमध्ये वाढ, एआयएमआयएम चौथ्या स्थानी

Congress wins Telangana in South election
तेलंगणचा काँग्रेसला ‘हात’; बीआरएसची हॅट्ट्रिक हुकली

तिन्ही हिंदी भाषक राज्यांनी काँग्रेसला नाकारले असताना दक्षिणेतील तेलंगणने काँग्रेसला विजय साजरा करण्याची संधी दिली. राज्यातील ११९ जागांपैकी काँग्रेसने ६४ जागांवर विजय मिळवला. सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्ट्रिक साधण्याचे बीआरएसचे स्वप्न हवेत विरले. पराभव स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी राज्यपाल टी सौंदर्याराजन यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला.

दुसरीकडे, काँग्रेसच्या विजयाच्या बातम्या येऊ लागल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्या निवासस्थानी आणि गांधी भवन या पक्षाच्या राज्यातील मुख्यालयामध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला. कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले आणि ‘जय काँग्रेस’ व ‘रेवंत अण्णा जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. काँग्रेस पक्ष तेलंगणच्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

Arvind Kejriwal and rahul gandhi
दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणात आप आणि काँग्रेसमध्ये जुळलं, जागा वाटप जवळपास निश्चित; कोणाला किती जागा मिळाल्या?
SP-Congress alliance
इंडिया आघाडीसाठी यूपी बूस्टर ठरणार, प्रियंका गांधींनी अखिलेश यांना केला फोन अन् सपा-काँग्रेसची आघाडी निश्चित
Sonia Gandhi filed candidature
सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढवणार, पण इंडिया आघाडीचे भवितव्य काय?
arvind kejriwal
पंजाब, चंडीगडमध्ये ‘आप’ स्वबळावर; केजरीवाल यांच्या घोषणेमुळे ‘इंडिया’ आघाडीला आणखी एक धक्का

२०१८च्या निवडणुकीत ८७ जागा मिळवणाऱ्या बीआरएसने निम्म्यापेक्षा जास्त जागा गमावल्या असून त्यांची ३९ जागांवर घसरण झाली. यामुळे बीआरएसच्या राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या प्रयत्नांनाही खीळ बसणार आहे.

हेही वाचा >>>Telangana Election Result 2023 : बीआरएसच्या गाडीला ब्रेक, काँग्रेसच्या पंजाला साथ; कोणी किती जागांवर मारली बाजी?

सरकारबद्दलची नाराजी, भ्रष्टाचाराचा आरोप, घराणेशाही यातूनच राष्ट्रीय पातळीवर राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या चंद्रशेखर राव यांना सत्ता गमवावी लागली. दहा वर्षे सत्तेत असलेल्या केसीआर यांच्या सरकारबद्दल लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. विशेषत: शेतकरी वर्ग नाराज होता. ‘रयतु बंधू’ योजनेचा लाभ मोठय़ा शेतकऱ्यांनी उठविला होता. छोटय़ा शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही. तांदूळ खरेदी करण्याचे आश्वासन देऊनही गेल्या दोन हंगामात राज्य सरकारने सर्व तांदूळ खरेदी केले नव्हते. घराणेशाहीचा आरोप सरकारवर कायमच होत असे. पुत्र, भाचा, मुलगी सारी सत्ताकेंद्र चंद्रशेखर राव यांच्या घरात होती. राव यांनी सुरुवातीला भाजपला मदत केली. पण भाजपला तेलंगणा राज्य खुणवू लागताच राव यांची कोंडी करण्याचाच अधिक प्रयत्न केंद्रातील भाजपने केला होता.

दुसरीकडे, भाजपने आपल्या २०१८च्या कामगिरीमध्ये सुधारणा केली आहे. भाजपने आठ जागेवर विजय मिळवला. भाजपच्या जागा आणि मतांच्या टक्केवारीत वाढ झाली. हैदराबाद शहरात मतांच्या ध्रुवीकरणाचा भाजपला फायदा झाला.

गेल्या विधानसभेत काँग्रेसचे आमदार फुटल्यानंतर प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या ऑल इंडिया मजलिस-एत्तेहादुल-मुस्लिमीन या पक्षाची चौथ्या स्थानावर घसरण झाली. त्यांनी सात मतदारसंघांमध्ये विजय मिळवला. भारत राष्ट्र समिती आणि एमआयएम युती म्हणजे भाजपचा ब संघ असा काँग्रेसने केलेला प्रचारही चंद्रशेखर राव यांना महागात पडला आहे. काँग्रेसबरोबर आघाडी केलेल्या भाकपचे के संभाशिव राव कोठागुडेम मतदारसंघात विजयी झाले.

राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचा फटका ?

राव यांनी राष्ट्रीय पातळीवर स्वच:चे स्थान निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय राजकारणात उडी मारली होती. तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे त्यांनी भारत राष्ट्र समिती असे नामकरण केले. देशभर विविध राज्यांमध्ये दौरे केले. बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या. स्वत:चे राजकीय महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले. मात्र, तेलंगणातील पराभवामुळे त्यांच्या एकूणच राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका बजाविण्याच्या योजवनेला खीळ बसली आहे.

महत्त्वाचे विजय आणि पराभव

मावळते मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव गजवेलमधून तर रेवंत रेड्डी कोडंगलमधून विजयी झाले. एआयएमआयएमचे अकबरुद्दीन ओवैसी यांनी चंद्रयानगुट्टा मतदारसंघ राखला, त्यांनी ८१ हजार ६६० मतांनी बीआरएसच्या उमेदवाराचा पराभव केला. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि काँग्रेसचे माजी खासदार मोहम्मद अझरुद्दीन ज्युबिली हिल्स मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष एम हनुमंत राव मलकाजगिरीमधून पराभूत झाले.

सर्वात जास्त आणि कमी फरक

केसीआर मंत्रिमंडळातील अर्थमंत्री टी हरीश राव हे सिद्दिपेट मतदारसंघातून तब्बल ८२ हजार ३०८ मतांनी विजयी झाले. चेवेल्ला मतदारसंघामध्ये बीआरएसचे केले येदै हे सर्वाधिक कमी म्हणजे २६८ मतांनी आघाडीवर होते.

मुख्यमंत्रीपदाचा प्रबळ दावेदार!

तेलंगणामध्ये गेल्या निवडणुकीत १९ जागांवरून ६४ जागांवर झेप घेणाऱ्या काँग्रेसच्या विजयात प्रदेशाध्यक्ष ५६ वर्षीय अनुमुला रेवंत रेड्डी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राज्यामध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समितीविरोधात जनमत तयार करण्यासाठी काही वर्षांपासून त्यांनी आक्रमकपणे प्रचार केला. विशेषत: तरुणांमध्ये बेरोजगारीबद्दल असलेला आक्रोश लक्षात घेऊन हा मुद्दा ऐरणीवर आणला, त्याविरोधात यात्रा काढली. मोठय़ा प्रमाणात गर्दी खेचणारा नेता अशी त्यांची प्रतिमा या काळात ठसली. केसीआर आणि त्यांच्या कुटुंबावर त्यांनी सार्वजनिक सभा आणि मुलाखतींमध्ये सतत लक्ष्य केले.  रेवंत रेड्डी यांच्याकडे २०२१मध्ये प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हा पक्ष अंतर्गत मतभेदांनी ग्रस्त होता. अजूनही पक्षात पूर्ण आलबेल नाही. उत्तम रेड्डी यांनी आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे संकेत दिले आहेत. खुद्द रेवंत रेड्डी यांच्याविरोधात मनमानीपणाच्या आणि स्वत:च्या समर्थकांना पुढे आणण्याच्या तक्रारी झाल्या.

दुसरीकडे, रेवंत रेड्डी यांनी प्रचारासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी दिवसाला किमान चार सभा घेतल्या आणि स्वत:चे राज्यस्तरीय नेतृत्व प्रस्थापित केले. पक्षश्रेष्ठींशी विशेषत: राहुल गांधी यांच्याबरोबर त्यांनी सुसंवाद ठेवला. तेलंगणात भारत जोडो यात्रेच्या आयोजनामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

विशेष म्हणजे काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आलेल्या रेवंत रेड्डी यांच्या राजकारणाती सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून झाली. त्यानंतर ते तेलुगू देसम पक्षात गेले. त्यांनी त्याच पक्षाच्या तिकिटावर २००९ आणि २०१४ मध्ये कोडांगल मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. त्यानंतर लाचखोरीच्या आरोपांनंतर त्यांनी तेलुगू देसम पक्ष सोडला आणि ऑक्टोबर २०१७ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २०१८मध्ये ते कोडांगल मतदारसंघातून बीआरएसच्या (तेव्हा टीआरएस) उमेदवाराकडून पराभूत झाले. काहीच महिन्यांमध्ये त्यांनी मल्काजगिरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress wins telangana in south election amy

First published on: 04-12-2023 at 04:30 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×