जम्मू : जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा पुन्हा द्यावा, अशी मागणी करीत आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. ‘हमारी रियासत, हमारा हक’ असा नारा देऊन काँग्रेसने आंदोलन केले.
काँग्रेसला रॅली काढण्याची परवानगी न देण्याची पोलिसांची ही दुसरी वेळ होती. काँग्रेसचा मोर्चा शनिवारी श्रीनगर येथे पोलिसांनी रोखला. प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष तारिक हमीद कारा आणि पक्षाचे सरचिटणीस जी. ए. मिर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे नियोजन केले होते. जम्मूतील पक्षाच्या मुख्यालयात शेकडो कार्यकर्ते जमले होते. राज भवनपर्यंत मोर्चा काढून नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना ते निवेदन देणार होते. पण पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. कारा आणि मिर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
कारा यांनी अधिकाऱ्यांचा निषेध करत म्हटले की, ‘‘या कृतीद्वारे त्यांची मानसिकता दर्शविते की ते लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवत नाहीत आणि जनतेच्या आवाजाचा आदर करत नाहीत. काँग्रेस कार्यकर्ते अशांतता पसरवण्यासाठी रस्त्यावर उतरले नव्हते. जनतेची राज्य निर्मितीची तळमळ नायब राज्यपालांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.’’ पोलिसांच्या कृतीमुळे काँग्रेस दबून जाणार नाही, परंतु आमच्या हक्कांसाठी लढण्याचा आमचा निर्धार आणखी मजबूत करेल, असे ते म्हणाले.