लहान मुलांच्या कार्यक्रमांना मिळणाऱ्या वाढत्या पसंतीमुळे बोकाळलेल्या कार्टून चॅनेल्सवर दाखवण्यात येणाऱ्या बीभत्स दृश्यांवर आता प्रसारण दृश्य तक्रार परिषदेची (ब्रॉडकास्टिंग कंटेन्ट कम्प्लेन्टस कौन्सिल- बीसीसीसी) नजर पडली आहे. काटरूनच्या नावाखाली या वाहिन्यांवरील कार्यक्रमांत चुंबन दृश्ये, हिंसा, शिवीगाळ, छेडछाड या गोष्टी दाखवण्यात येत असल्याच्या तक्रारींनंतर बीसीसीसीने सर्व कार्टून्स चॅनेल्सना दृश्यनिवडीबाबत सावधगिरी बाळगण्याची ताकीद दिली आहे.
भारतात प्रसारित होणाऱ्या वाहिन्यांवरील कार्यक्रमांबाबतच्या तक्रारींवर निवाडा करणाऱ्या ‘बीसीसीसी’कडे अलीकडच्या काळात कार्टून वाहिन्यांसंदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. ‘लहान मुलांसाठी’ म्हणून जाहिरात केल्या जाणाऱ्या एका वाहिनीवरील कार्यक्रमाच्या जाहिरातीत चुंबन दृश्ये दाखवण्यात आली, तर एका कार्यक्रमातील कार्टून व्यक्तिरेखा आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचे दाखवण्यात आले. अन्य एका दृश्यात एक कार्टून व्यक्तिरेखा एका मुलीचा स्कर्ट खेचण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारची हिंसक आणि अश्लील दृश्ये अनेकदा या वाहिन्यांवरून प्रसारित केली जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
काही कार्टून वाहिन्यांवर प्रौढांसाठीच्या रिअ‍ॅलिटी शो वा अन्य कार्यक्रमांच्या जाहिराती दाखवण्यात येत असल्याच्या तक्रारीही बीसीसीसीकडे आल्या आहेत. तसेच या वाहिन्यांवरून ‘यूए’ प्रमाणपत्र असलेले भयपट वा अ‍ॅक्शनपट दाखवण्यात येत असल्याच्याही तक्रारी आहेत. या पाश्र्वभूमीवर गुरुवारी झालेल्या बैठकीत बीसीसीसीचे प्रमुख निवृत्त न्या. ए. पी. शाह यांनी या तक्रारींची गंभीर दखल घेतली.
यावेळी काही प्रसारण कंपन्यांनी आपली बाजू मांडताना केवळ लहान मुलांसाठी असे वाहिन्यांचे वर्गिकरण करण्यात आले नसल्याचे सांगितले. मात्र, काही वाहिन्यांनी स्वत:च लहान मुले ही आपले प्रमुख दर्शक असल्याचे ठरवून त्या पद्धतीचे कार्यक्रम दाखवावेत, असा सल्ला बीसीसीसीने दिला. बीसीसीसीला कोणावरही सेन्सॉरशिप लादायची नाही. मात्र, कार्टून वाहिन्यांनी आपल्या कार्यक्रमांची निवड अधिक सावधपणे करावी, अशी ताकीदही परिषदेने दिली.

कार्टून वाहिन्यांची वयोपरत्वे संख्या (टक्क्यांत)
४ ते १४        ६१ टक्के
१५ ते २४        ९ टक्के
२५ ते ३४         १३ टक्के
३५ पेक्षा जास्त     १७ टक्के
(संदर्भ : टीएएम मीडिया रिसर्च)