वादग्रस्त धर्मप्रसारक झाकिर नाईकला राष्ट्रीय तपास यंत्रणेने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. झाकिर नाईकने १४ मार्चपर्यंत नवी दिल्ली येथील मुख्यालयात हजर राहावे, अशी नोटीस एनआयएने बजावली आहे. तर मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने झाकिर नाईकची बहिण नैलाह नूरानी हिची आज चौकशी केली आहे.
NIA asks controversial Islamic preacher Zakir Naik to appear before it on March 14
— The Indian Express (@IndianExpress) March 7, 2017
चिथावणीखोर भाषणे करून तरुणांना दहशतवादाकडे वळवण्यास प्रवृत्त केल्याचे झाकीर नाईकवर आरोप झाल्यानंतर सरकारने त्याच्या ‘पीस टीव्ही’ या वाहिनीवर आणि संकेतस्थळांवर बंदी घातली होती. एनआयए तसेच मुंबई पोलिसांनी त्याच्या मुंबईतील मालमत्तांवर छापा टाकून तपासणीही केली होती. नाईकने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेमार्फत पैशांची मोठय़ा प्रमाणात हेराफेरी केल्याचेही नंतरच्या तपासात सिद्ध झाले आहे. दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याबद्दल एनआयएने नाईकविरोधात गेल्या महिन्यात गुन्हा दाखल केला असून, मुस्लिम तरुणांना भडकवण्याचे काम केल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांनीही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या तपासाचा पुढील भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने नाईकला समन्स बजावत जानेवारीच्या अखेरपर्यंत हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र, नाईक ‘ईडी’समोर झाला नव्हता. पोलिसांनी अटक करू नये म्हणून नाईक सौदी अरेबियात लपून बसल्याचे सांगण्यात येत आहे. नाईकने अवैधरीत्या पैसे कुठून जमवले आहेत व त्यांचा गुन्ह्य़ांसाठी वापर कसा केला आहे याचा संचालनालय सध्या माग काढत आहे. यासाठी नाईकच्या घरातून व कार्यालयातून हस्तगत केलेली अनेक कागदपत्रेही तपासण्यात आली आहेत.
दरम्यान, सक्तवसुली संचालनालयानेही झाकीर नाईकला समन्स बजावले होते. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा नोंदवल्यानंतर ‘ईडी’ने झाकीर नाईकला वारंवार समन्स बजावले आहेत. काही दिवसांपूर्वी झाकीर नाईकने त्याच्या वकीलांमार्फत ईडीला उत्तर दिले होते. प्रत्यक्ष हजर होण्याबाबत नाईकने काही महिन्यांची मुदत मागून घेतली होती. तसेच स्काइप, फोनवरून ‘ईडी’च्या चौकशीला सामोरा जाण्यास तयार आहे, ‘ईडी’ला हवी असलेली सर्व कागदपत्रे, माहिती देण्याची तयारी आहे, असे नाईकने म्हटले होते. पण ईडीने झाकीर नाईकची मागणी फेटाळून लावली होती. आर्थिक गैरव्यवहारांतर्गत अशा प्रकरची तरतूद नसल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले होते.