वादग्रस्त विधाने करणाऱ्या भाजप नेत्यांच्या यादीत सोमवारी आणखी भर पडली. भाजपच्या चार नेत्यांनी आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याने त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले.  म. गांधी यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळ ही ब्रिटिश सत्ताधीशांशी केलेली तडजोड होती, असे विधान भाजपचे कर्नाटकमधील खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केले. ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी कोणताही त्याग केला नाही त्यांनीच उपोषण, सत्याग्रहामुळे स्वातंत्र्य मिळाले या गोष्टीवर देशाला विश्वास ठेवण्यास भाग पाडले आणि ते महात्मा (महापुरुष) झाले, असे वक्तव्य हेगडे यांनी कर्नाटकातील जाहीर सभेत केले. या प्रकरणी भाजपने हेगडे यांना नोटीस बजावली आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दहशतवादी असल्याचे म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केजरीवाल, तुम्ही दहशतवादी आहात आणि त्याचे अनेक पुरावेही आहेत, असे वक्तव्य जावडेकर यांनी करून खळबळ उडवून दिली. केजरीवाल स्वत:ला शासनविरोधी म्हणतात, मात्र शासनविरोधक आणि दहशतवादी यांच्यात विशेष फरक नाही, असे जावडेकर दिल्लीत म्हणाले. मुंबईत वसई येथे भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्र्यांना उद्देशून  वादग्रस्त विधान केले. सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी राज्यात लागू करणार नाही, या मंत्र्यांच्या भूमिकेवर टीका करताना ‘हे राज्य तुमच्या बापाचे आहे का’, असे वक्तव्य शेलार यांनी केले. त्यावर टीका होऊ लागताच त्यांनी सारवासारव केली.

भाजपचे चौथे वाचाळवीर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी, एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा उल्लेख दहशतवादी असा केला. ‘ओवैसी यांच्यासारखे अतिरेकी जामिया मिलिया विद्यापीठ आणि अलिगढ मुस्लीम विद्यापीठासारख्या संस्थांमध्ये देशाविरुद्ध विष पेरून देशद्रोह्य़ांचे सैन्य उभारत आहेत. पाकिस्तानची निर्मिती त्यांच्यासारख्यांसाठी करण्यात आली होती, असे ट्वीट गिरीराज यांनी केले.

हेगडेंच्या वक्तव्याबद्दल मोदींनी माफी मागावी – काँग्रेस</strong>

राष्ट्रपिता म. गांधीजींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळीसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल भाजपचे खासदार हेगडे यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली. मोदी यांची बांधिलकी नथुराम गोडसेशी आहे की राष्ट्रपिता म. गांधींशी, हे त्यांनी सिद्ध करण्याची हीच वेळ आहे, असेही काँग्रेसने म्हटले आहे.

म. गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळ ही ब्रिटिश सत्ताधीशांशी केलेली तडजोड होती.  – अनंतकुमार हेगडे, भाजप खासदार

केजरीवाल, तुम्ही दहशतवादी आहात आणि हे सिद्ध करणारे भरपूर पुरावेही आहेत.   – प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री

महाराष्ट्रात ‘सीएए’, ‘एनआरसी’ का लागू होऊ देणार नाही?  राज्य तुमच्या बापाचे आहे का? – आशीष शेलार, भाजप आमदार

ओवैसी यांच्यासारखे दहशतवादी जामिया, एएमयूसारख्या संस्थांमध्ये देशद्रोह्य़ांचे सैन्य उभारत आहेत.  -गिरीराज सिंह, भाजप खासदार

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversial statements bjp leaders political circle akp
First published on: 04-02-2020 at 02:03 IST