Corona Virus करोनाचे रुग्ण भारतात वाढू लागले आहेत, त्यामुळे करोनाने पुन्हा एकदा भारताची चिंता वाढवण्यास सुरुवात केली आहे. भारतात करोना रुग्णांची संख्या ३ हजारांच्या वर पोहचली आहे. सध्याच्या घडीला देशभरात १३३६ सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्र, दिल्लीत रुग्णसंख्या वाढली आहे. त्याचप्रमाणे केरळमध्येही रुग्ण वाढत आहेत.
महाराष्ट्रात ४६७ सक्रिय रुग्ण
शनिवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात करोनाचे ४६७ सक्रिय रुग्ण आहेत. तर दिल्लीतही करोनाचे रुग्ण वाढत असून एका ६० वर्षीय महिलेचा आणि ७१ वर्षीय माणसाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. कोलकाता या ठिकाणी करोनाचे ३० सक्रिय रुग्ण आहेत.
कर्नाटकाने शाळांसाठी दिले निर्देश
कर्नाटक सरकारने करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने सावधगिरीचा उपाय म्हणून मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. कर्नाटक सरकारच्या निर्देशांनुसार ज्या मुलांना ताप, खोकला आणि सर्दी ही लक्षणं जाणवत आहेत त्यांना शाळेत पाठवू नये असं सांगण्यात आलं आहे. तसंच शाळांनाही मुलांमध्ये आजारांची काही लक्षणं दिसत आहेत का हे तपासा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जून महिना सुरु झाला आहे त्यामुळे अनेक राज्यांमध्ये शाळा सुरु होत आहेत. त्या अनुषंगाने ही नियमावली जारी करण्यात आली आहे.
कुठल्या राज्यांमध्ये किती रुग्ण?
समोर आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ४६७, दिल्लीत ३७५, गुजरातमध्ये २६५, कर्नाटकात २३४, पश्चिम बंगालमध्ये २०५, तामिळनाडुमध्ये १८५ तर उत्तर प्रदेशात ११७ जणांना करोनाची लागण झाली आहे. बिहारमध्येही करोनाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट देण्यात आला आहे.
करोना संक्रमणापासून वाचण्यासाठी काळजी घ्या
करोना संक्रमणापासून वाचण्यासाठी काळजी घ्या असं आवाहन सर गंगाराम रुग्णालयाचे सीनियर कन्सल्टंट डॉ. एम. वली यांनी म्हटलं आहे की करोनाच्या चाचण्या जशा वाढतील त्याप्रमाणे रुग्णसंख्या वाढताना दिसणार आहे. मात्र आता तसं घाबरण्याचं कारण नाही. तसंच करोना संक्रमाणापासून वाचण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या. नवे रुग्ण आढळले तरीही घाबरण्यासारखं काही नाही. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे म्हणजेच मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असलेले रुग्ण, आजाराचा इतिहास असणारे लोक आणि वृद्ध महिला किंवा पुरुष यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे असं वली यांनी म्हटलं आहे.
आत्तापर्यंत करोनामुळे २६ रुग्णांचा मृत्यू
१ जानेवारी २०२५ ते ३१ मे २०२५ या कालावधीत करोनामुळे देशभरात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यांचा मृत्यू झाला आहे त्या व्यक्ती प्रत्येकी दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या राज्यांतील आहेत.