करोनामुळे देशावर ओढावलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पंतप्रधान केअर्स मदतनिधीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमेल तितकी रक्कम या निधीमध्ये द्यावी असं आवाहन करत या फंडाच्या खात्याची माहिती आपल्या ट्विटर अकाउंटवरुन दिली होती. त्यानंतर अनेक बड्या उद्योग समुहांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत अनेकांनी या निधीमध्ये आपला हातभार लावला आहे. मात्र एका व्यक्तीने पंतप्रधान मोदींना टॅग करुन मी केवळ ५०१ रुपयेच देऊ शकतो असं सांगत ऑनलाइन पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉर्ट शेअऱ केला. त्यावर मोदींनी दिलेला रिप्लाय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

२८ मार्च रोजी मोदींनी ट्विटवरुन पीएम केअर्स फंडाचा अकाऊंट नंबर, बँकेचे नाव अशी ऑनलाइन व्यवहारासाठी लागणारी सर्व माहिती दिली. ”माझं सर्व भारतीयांना आवाहन आहे की त्यांनी पीएम केअर्स फंडासाठी सहाय्य करावं. भविष्यात अशीच काही संकटे आल्यास त्या संकटांवर मात करण्यासाठी या फंडामधील पैसे वापरले जातील. पीएम केअर्स फंडामध्ये छोट्यात छोटी रक्कमही स्वीकारली जाईल. या निधीमुळे आपत्कालीन क्षमता सक्षम करण्यास आणि आपल्या नागरिकांचे सौंरक्षण करण्याचं सामर्थ्य वाढवता येणार आहे,” असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

मोदींच्या आवहानाला मोठा प्रतिसाद मिळाला. अनेकांनी शक्य होईल तितकी रक्कम या फंडासाठी दिली. या फंडामध्ये निधी दिल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावाने मोदींची सही असलेली एक डिजीटल थँक यू नोट पाठवली जाते. अगदी मोठ्या मोठ्या उद्योगपतींपासून सामान्य नागरिकांपर्यंत अनेकांनी या फंडासाठी निधी दिला. ट्विटवर असणाऱ्या सय्यद रेमान या व्यक्तीनेही ५०१ रुपयांचा निधी पीएम केअर्स फंडासाठी दिला. हा निधी दिल्यानंतरचा डिजीटल ट्रानझॅक्शनचा स्क्रीनशॉर्ट रेहमानने मोदींना टॅग करुन ट्विट केला. “माझ्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोना विरुद्ध लढण्यासाठी तयार केलेल्या पीएम केअर्ससाठी थोडीशी मदत,” असं रेहमान यानी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

पंतप्रधान मोदींनी रेहमानच्या या ट्विटला ट्विटवरुनच उत्तर दिलं. “लहान मोठ असं काही नसत. प्रत्येकाने केलेली मदत महत्वाची आहे. यामधून करोनाला हरवण्यासाठी आपल्या सर्वांचे समान भूमिका दिसून येते,” असं उत्तर मोदींनी ट्विटवरुन दिलं आहे.

मोदींच्या या ट्विटला पाच हजार ८०० हून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. तर ४४ हजारहून अधिक जणांनी लाइक केलं आहे.