देशामधील करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. करोनामुळे अनेक आर्थिक व्यवहार आणि उद्योग धंदे बंद असल्याने देशाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशाच करोनाविरुद्ध लढण्यासाठी जनतेने आर्थिक मदत करावी असं आवाहन सरकारी यंत्रणांच्या मार्फत केलं आहे. अगदी केंद्र सरकारनेही पीएम केअर्स मदत निधी सुरु केला आहे. तर सर्वच राज्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीप्रमाणे कोवीड-१९ सहाय्यता निधीसाठी जनतेला आवाहन केलं आहे. या आवहानाला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील काही आठवड्यांमध्ये वेगवेगळ्या स्तरातील लोकांनी पुढे येऊन या कामासाठी पैसे दिले आहेत. अगदी सफाई कर्मचाऱ्यांपासून ते बड्या बड्या उद्योजकांपर्यंत आणि क्रिकेटर्सपासून ते कला क्षेत्रातील दिग्गजांपर्यंत अनेकांनी या मदतनिधीमध्ये हातभार लावला आहे. अशाचप्रकार सामाजिक भान जपत शवविच्छेदनाचे काम करणाऱ्या एका व्यक्तीने आपला एका महिन्याचा पगार महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे. यासंदर्भात बुलढाणा जिल्हा माहिती केंद्रानेच ट्विट करुन माहिती दिली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सरकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्हा रुग्णालयामध्ये सफाई कर्मचारी पदावर कार्यरत असणाऱ्या शवविच्छेदनाचे काम करणाऱ्या मोहम्मद अफसर शेख गफ्फार या कर्मचाऱ्याने आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला आहे. “बुलढाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात सफाईगार पदावर शवविच्छेदनाचे काम करणारे मोहम्मद अफसर शेख गफ्फार यांनी कोविड – १९ आजारावरील नियंत्रणाच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक महिन्याचे २३ हजार रूपये वेतन आज (६ मे रोजी) बँक खात्यात जमा केले,” असं ट्विट बुलढाण्यातील माहिती केंद्राने केलं आहे. यामध्ये गफ्फार आणि पैसे भरल्याच्या बँकेच्या पावतीचा फोटोही ट्विट करण्यात आला आहे.
#बुलडाणा: जिल्हा सामान्य रूग्णालयात सफाईगार पदावर शव विच्छेदनाचे काम करणारे मोहम्मद अफसर शेख गफ्फार यांनी कोविड – 19 आजारावरील नियंत्रणाच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक महिन्याचे 23 हजार रूपये वेतन आज बँक खात्यात जमा केले. @oiseaulibre3 @MahaDGIPR @CMOMaharashtra pic.twitter.com/9m6c2yrXtI
— DISTRICT INFORMATION OFFICE, BULDHANA (@InfoBuldhana) May 6, 2020
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
एप्रिल महिन्यामध्ये अशाच प्रकारे तेलंगणामधील एका सफाई कर्मचाऱ्याने त्याचा दोन महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला होता. तेलंगणाचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री के.टी रामा राव यांनी ट्विटवरुन या कर्मचाऱ्याचे कौतुक केलं होतं. “माझ्या राज्यातील सामान्य नागरीक हेच खरे हिरो आहेत. आज बोंथा साई कुमार या उत्तनूरमधील सफाई कामगाराने त्याच्या दोन महिन्याचा पगार १७ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले,” असं राव यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. या ट्विटसोबत त्यांनी हा तरुण अधिकाऱ्यांकडे १७ हजारांचा धनादेश देतानाचा फोटोही ट्विट केला होता.