Coronavirus: “आपण बँक कर्मचाऱ्यांच्या आयुष्याशी खेळतोय का?”; महाराष्ट्र भाजपाचा सवाल

अर्थमंत्री निर्मला सितारमन आणि रिझर्व्ह बँकेला केला सवाल

प्रतीकात्मक छायाचित्र

देशभरात करोनानं थैमान घातलं आहे. या परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठी पावलं उचलण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी संध्याकाळी पुढील २१ दिवस देश पूर्णपणे लॉकडाउन राहिल अशी घोषणा केली आहे. परंतु त्यातून बँकींकसह काही महत्वाच्या सेवा पुरवणाऱ्या क्षेत्रांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना लॉकडाउनमध्येही कामावर जावं लागतं आहे. याच पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा आणि गैरसोयीचा विचार करताना महाराष्ट्र भाजपाने बँका आणि शेअर बाजारही काही दिवस बंद ठेवावा अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ट्विटवरुन देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन यांना टॅग करत बँका सुरु ठेवण्याबद्दल फेरविचार करावा असे मत व्यक्त केलं आहे. “आपण सगळे शेअर बाजार आणि बँका काही दिवस बंद ठेऊ शकतो का? हे जरा कठीण वाटतं असलं तरी महत्वाचं आणि करता येण्यासारखं आहे,” असं ट्विट वाघ यांनी केलं आहे. “अगदी बंद नाही ठेवता आलं तरी दिवसाआड काम करण्याची मुभा या संस्थांना देता येईल का? आपल्याला रोज कशासाठी बँकेत जावं लागतं? आपण बँकेत काम करणाऱ्यांशी आयुष्याशी खेळतोय का?,” असे प्रश्न वाघ यांनी आपल्या ट्विटमधून उपस्थित केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनाही टॅग केलं आहे.

देशभरामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्याआधीच राज्यातील अनेक सार्वजनिक वाहतूक सेवांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. अशातही बँक कर्मचाऱ्यांना मोठ्या कष्टाने प्रवास करुन कामावर जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर बँकांनाही कामाच्या वेळांमध्ये बदल, कमी कर्मचारी संख्या अशा काही उपाययोजना केल्या आहेत. ग्राहकांनी जास्तीत जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शनचा वापर करावा, असं आवाहन बँकांकडून करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त खबरदारीचा उपाय म्हणून या बँकांनी कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी केली आहे. अनेक लहान मोठ्या बँकांनी आपल्या स्तरावर काही महत्वपूर्ण निर्णय घेतले असले तरी बँका सुरु असल्याने कर्मचारी वर्गाला त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार बँकेतील कर्मचारींनी केली आहे.

एचडीएफसीनं घेतला हा निर्णय

एचडीएफसी बँकेनं आपल्या कामकाजाची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ही बँक कार्यरत राहणार आहे. तसंच परदेशी चलन बदलणं आणि पासबुक अपडेटसारख्या सुविधा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या आहेत. रविवारी बँकेनं ग्राहकांना यासंबंधी सुचनादेखील पाठवल्या आहेत.

डिजिटल बँकींगचा वापर करा

दुसरीकडे आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांना एसएमएस पाठवून बदल केल्याची माहिती दिली आहे. “आमच्या सर्व शाखांमध्ये स्वच्छतेविषयी विशेष लक्ष देण्यात येईल. तसंच कर्मचाऱ्यांची संख्याही कमी राहिल. तसंच ग्राहक मदत केंद्रांमध्येही कर्मचाऱ्यांची संख्या कमी राहिल. आम्ही सुरक्षेवर लक्ष देण्याचं आवाहन करत आहोत. तसंच महत्त्वाच्या बँकींग सेवांसाठी आय-मोबाईल किंवा इंटरनेट बँकींगचा वापर करावा,” असं बँकांकडून सांगण्यात आलं आहे.

पेझॅप, यूपीआय वरून करा बिलांचा भरणा

एचडीएफसी बँकेनं शाखांमधील गर्दी कमी करण्यासाठी ड्रॉपबॉक्समध्ये चेक टाकण्यास सांगितलं आहे. तसंच पासबुक अपडेट आणि फॉरेक्स कार्ड रिलोड सारख्या सुविधांसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. याव्यतिरिक्त एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस आणि यूपीआयसारख्या माध्यमांचा वापर करून ट्रान्झॅक्शन करण्यास बँकेनं सांगितलं आहे. याव्यतिरिक्त यूपीआय किंवा पेझॅपसारख्या माध्यमांचा वापर करून बिलांचा भरणा करावा, असंही बँकेनं नमूद केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Coronavirus can we shut down all share markets and banks for few days asks spokesperson maharashtra bjp avadhut wagh scsg

ताज्या बातम्या