करोना विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे देशभरात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात करोना बाधितांची एकूण संख्या ६४९ आहे. त्यात ५९३ जण अजूनही करोना पॉझिटिव्ह आहेत. ४२ जण करोना मुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली. जगभरातील करोनाग्रस्तांची संख्या ४ लाख ६० हजारांहून अधिक झाला आहे. तर मृतांची संख्या २० हजारहून अधिक झाली आहे. असं असताना भारतामध्येही करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारने संपूर्ण देशच २१ दिवस लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला असून २५ मार्च ते १४ एप्रिल या काळामध्ये देशामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. देशातील करोनाग्रस्तांची संख्या वाढेल अशी भिती व्यक्त केली जात असतानाच एका वरिष्ठ डॉक्टरने मात्र वेगळाच अंदाज व्यक्त केला आहे. देशातील करोनाग्रस्तांची संख्या वाढली तरी भारतामध्ये करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा वाढणार नाही असा अंदाज इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि एम्स रुग्णालयाचे इम्युनोलॉजीचे माजी प्रमुख डॉक्टर नरिंदर मेहरा यांनी व्यक्त केला आहे.

भारत सर्वाधिक रोगप्रतिकारशक्ती असणार देश

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर सर्वच राज्यांनी या लॉकडाउनदरम्यान नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करुन करोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. देशामध्ये करोनामुळे आत्तापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. असं असलं तरी मेहरा यांनी “सर्वाधिक रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्या देशांमध्ये भारत अव्वल क्रमांकावर असल्याने आपल्या देशात करोनामुळे मृत्यांची संख्या वाढणार नाही,” असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र प्रतिकारशक्तीच्या बाबतीत भारतीय जगभरातील इतर देशांच्या तुलनेत अव्वल असले तरी सरकारने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत महत्वाचे असल्याचेही मेहरा यांनी नमूद केलं आहे.

…म्हणून भारतीय अधिक दणकट

“जेव्हा शरिरामध्ये एखादे व्हायरल संसर्ग करणाऱ्या विषाणूचा शिरकाव होतो तेव्हा शरिरामधील लिंफोसाइटची (पांढऱ्या रक्त पेशींचा एक प्रकार) संख्या वाढते. मात्र कोवीड-१९चा संसर्ग झाल्यास असं न होता उलटं होतं. करोनाचा संसर्ग झाल्यास लिंफोसाइटची संख्या अचानक कमी होते. त्यामुळेच रुग्णाचा मृत्यू होतो. लिंफोसाइट या पांढऱ्या रक्त पेशींचा एक प्रकार असून शरिरात प्रवेश करणाऱ्या विषाणूंबरोबर लढण्याचे काम त्या करतात. तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे आणि संसर्गापासून तुम्हाला दूर ठेवण्याचे काम पांढऱ्या रक्तपेशीच करतात,” असं मेहरा यांनी स्पष्ट केलं. मेहरा यांनी एम्समध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासाचा संदर्भ देत भारतीयांमधील रिस्पॉन्स जीन्स हे युरोपियन देशातील नागरिकांपेक्षा अधिक सक्षम असतात असंही सांगितलं. या रिस्पॉन्स जीन्समुळेच रोगप्रतिकारशक्ती वाढते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय आहारामधील हे पदार्थ महत्वाचे

देशातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा कमी असण्यामागे तीन कारणे आहेत असं मेहरा यांनी सांगितलं. यामध्ये भारतीय लोकांनी सोशल डिस्टंसिंगला म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी न जाता शारीरिक अंतर ठेवण्याच्या आवाहनाला दिलेला प्रतिसाद. दुसरे कारण भारतीयांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती आणि तिसरे कारण म्हणजे वातावरण. भारतीय आहारामध्ये हळद, आले आणि मसाल्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या पदार्थांमुळे इतर देशांच्या तुलनेत भारतीय लोकांची रोगप्रतिकार क्षमता अधिक मजबूत होते असंही मेहरा यांनी सांगितलं आहे.