देशभरात करोना व्हायरसचा उद्रेक सुरूच आहे. करोना रुग्णांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. राज्य सरकारांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरूवारी एकूण १.३१ लाख नवीन करोना रुग्णांची भर पडली. तर, जवळपास ८०० जणांचा मृत्यू झाला. देशात करोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


देशातील अ‍ॅक्टिव्ह करोना रुग्णांचा एकूण आकडा आता तब्बल १० लाखांजवळ पोहोचला आहे. सध्या हा आकडा ९.७४ लाख झाला असून रुग्णवाढीचा वेग असाच सुरू राहिल्यास लवकरच १० लाखांचा आकडा पार होण्याची शक्यता आहे. देशात करोनाचा सर्वाधिक कहर हा महाराष्ट्रा दिसत असून गेल्या १० दिवसांपासून दररोज ५० हजारांपेक्षा जास्त जणांना करोनाची लागण होत आहे. गुरूवारीही महाराष्ट्रात 56 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एकट्या मुंबईतून नऊ हजार नवीन रुग्णांची भर पडली. याशिवाय दिल्लीतही गुरूवारी जवळपास ७,५०० रुग्णांची भर पडली. दिल्ली-महाराष्ट्राशिवाय उत्तर प्रदेशमध्येही करोनाचा कहर सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये काल ८ हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले. करोनाचा शिरकाव झाल्यापासून हा उत्तर प्रदेशमधलाही सर्वाधिक आकडा असल्याचं समजतंय.

दरम्यान, करोनाचा फैलाव ‘युद्धपातळीवर’ रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले आहे. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले. ‘अनेक राज्यांमध्ये प्रशासनात शैथिल्य आल्याचे दिसत असून, करोनाबाधितांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे समस्याही वाढल्या आहेत. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे’, असे पंतप्रधानांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus india records over 1 3 lakh new cases in last 24 hours sas
First published on: 09-04-2021 at 09:44 IST