२२५ सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेत सत्तेचा दरबार कोण भरवणार याचा निकाल आज, बुधवारी लागणार आहे. मतमोजणी सकाळी आठ वाजेपासून सुरू होणार आहे. ५ मे रोजी झालेल्या निवडणुकीत ६५ टक्के कानडी मतदारांनी सुमारे २००० उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद केले होते. सत्ताधारी भाजपला या निवडणुकीत हादरा बसेल असा अंदाज जनमत चाचण्यांतून व्यक्त झाला आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बंड करून उभारलेला कर्नाटक जनता पक्ष, आक्रमक झालेला जनता दल (धर्मनिरपेक्ष) व काँग्रेसने केलेला प्रतिष्ठेचा मुद्दा या सर्व त्रराशिकामुळे कर्नाटक विधानसभेच्या निकालाकडे अवघ्या देशाचे राज्य लागून राहिले आहे. पाच वर्षांपूर्वी कर्नाटकातील सत्ता हस्तगत करून भाजपने दक्षिणदिग्विजय साजरा केला होता.