उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर त्याच्या मुलाने हा नैसर्गिक मृत्यू नसून त्यांची हत्या केल्याचा आरोप केला होता. यानंतर आज बांदाच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी मुख्तार अन्सारी मृत्यूप्रकरणात न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. गुरुवारी रात्री अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला होता. खासदार / आमदार न्यायालयाच्या न्यायमूर्ती गरिमा सिंह यांना एक महिन्याच्या आत बांदा मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे चौकशीचा अहवाल सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान बांदामधील शासकीय शल्यचिकीत्सकांनी मुख्तार अन्सारी यांचे शवविच्छेदन केले. त्यानंतर अन्सारी यांचे पार्थिव त्याच्या कुटुंबियांकडे देण्यात आले. गाझिपूर जिल्ह्यातील मुहम्मदाबाद याठिकाणी अन्सारीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अन्सारीचा मुलगा उमर अन्सारी याने आपल्या वडिलांवर विषप्रयोग केल्याचा आरोप केला होता. “त्यांच्यावर विषप्रयोग केला जात आहे, असे माझ्या वडिलांनी मला सांगितले होते”, अशी प्रतिक्रिया उमर अन्सारीने काल पत्रकारांना दिली होती.

“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

बांदा ते गाझीपूरचे अंतर ३८० किमी असून महामार्गाने पार्थिव गाझीपूर येथे नेत असताना कोणताही घातपात होऊ नये, यासाठी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात पार्थिव नेण्याची तयारी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या काही जिल्ह्यांमध्ये गडबड होऊ नये यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लागू करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या स्थानिक पोलिसांसह बांदा, माऊ, गाझीपूर आणि वाराणसी जिल्ह्याच तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

मंगळवारी मुख्तार अन्सारीचा भाऊ अफजल अन्सारीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या पथकाने अन्सारी यांच्यावर उपचार सुरू केले होते. तेव्हा ते आयसीयूमध्ये होते, माझी आणि त्यांची फक्त पाच मिनिटांची भेट होऊ शकली. त्यांनी मला सांगितले की, त्यांच्या जेवणातून त्यांना विषसदृश्य पदार्थ देण्यात येत आहे. ४० दिवसांपूर्वीही असाच प्रसंग घडला होता. तेव्हा त्यांना तात्काळ उपचार देण्यात आले होते. याबद्दल मी डॉक्टरांचा आभारी आहे. नाहीतर हा अनर्थ तेव्हाच घडला असता. अफजल अन्सारी हे गाझीपूरचे विद्यमान खासदार आहेत.

कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा तुरुंगात मृत्यू, घातपाताचा संशय; उत्तर प्रदेश पोलीस अलर्ट मोडवर!

मागच्या दोन वर्षात मुख्तार अन्सारीला आठ प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावण्यात आली होती. ६३ वर्षीय अन्सारीला बांदामधील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. माऊ विधानसभा मतदारसंघातून अन्सारीने पाच वेळा निवडणूक जिंकली होती. उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या विविध पोलीस ठाण्यात अन्सारीच्या विरोधात ६५ गुन्हे दाखल आहेत.