अमेरिका: अभिनेत्रीला वश करायला केला राष्ट्राध्यक्षांवरच हल्ला; ४० वर्षांनी बिनशर्त सुटका

अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावर गोळी झाडून हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीची विनाअट सुटका करण्यात आलीय.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन आणि त्यांच्यावर हल्ला करणारा आरोपी जॉन हिंकले (संग्रहित छायाचित्र AP)

अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन (Ronald Reagan) यांच्यावर गोळी झाडून हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीची विनाअट सुटका करण्यात आलीय. जॉन हिंकले असं या आरोपीचं नाव आहे. त्याने ४० वर्षांपूर्वी म्हणजेच ३० मार्च १९८० रोजी वॉशिंग्टनमधील हॉटेलबाहेर रेगन यांच्यावर हल्ला केला होता. मात्र, आता ६० वर्षीय जॉनला या प्रकरणात निर्दोष मुक्त करण्यात आलंय.

रोनाल्ड रेगनवर हल्ल्याचं कारण काय?

आरोपी जॉनने अमेरिकन अभिनेत्री जॉडी फॉस्टरला (actress Jodie Foster) प्रभावित करण्यासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावर हल्ला केल्याचं सांगितलं. त्याने अभिनेत्री जॉडी फॉस्टरचा टॅक्सी ड्रायव्हर हा चित्रपट पाहिला आणि तो पाहून तो तिच्या प्रेमात वेडा झाला. यानंतर त्याने जॉडीला प्रभावित करण्यासाठी थेट तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावर गोळ्या झाडत हल्ला केला. हिल्टन हॉटेल बाहेर झालेल्या या बेछुट गोळीबारात रेगन यांच्यासह सचिव जेम्स ब्रँडी, पोलीस अधिकारी आणि गुप्तचर विभागाचा अधिकारी जखमी झाले होते.

आरोपी जॉन हिंकले याने ३० मार्च १९८० मध्ये वॉशिंग्टनमध्ये केलेला हल्ला (संग्रहित छायाचित्र AP)

२०१६ मध्ये आरोपी जॉन हिंकलेची अटीशर्तींवर सुटका

दरम्यान यापूर्वी आरोपी जॉनला हल्ल्यानंतर तात्काळ वॉशिंग्टनच्या मानसोपचार रुग्णालयात ठेवण्यात आले होते. २०१६ मध्ये त्याला अनेक अटीशर्तींसह तेथून सोडण्यात आले. यात आईच्या घरापासून ८० किलोमीटर परिसराबाहेर न जाणे, अमेरिकेचे आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, काँग्रेस सदस्य राहत असलेल्या कोणत्याही परिसरात न जाणे या अटींचा समावेश होता.

आता न्यायालयाने न्याय विभाग आणि आरोपी हिंकले यांच्यातील एका कराराला मंजुरी दिलीय. यानुसार हिंकलेची जून २०२२ मध्ये विनाअट सुटका करण्यात येणार आहे.

द रोनाल्ड रेगन प्रेसिडेंशियल फाऊंडेशनने या निर्णयाला विरोध केलाय. हा निर्णय ऐकून दुःख झाल्याचं त्यांनी म्हटलंय. याशिवाय आरोपी जॉन हिंकले अजूनही इतरांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या सुटकेचा विरोध करतो, अशी भूमिका त्यांनी घेतली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Court release man who shoot ex us president ronald reagan pbs