भारतात पुढील सहा ते आठवड्यात करोनाची तिसरी लाट येणार असून ती टाळता येणं अशक्य असल्याचं एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. देशातील अनेक भागांमध्ये कडर निर्बंधांनंतर शिथीलता आणत अनलॉकची प्रक्रिया सुरु असताना रणदीप गुलेरिया यांनी एनडीटीव्हीशी बोलताना हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं मोठं आव्हान असून कोव्हिशिल्डमधील अंतर वाढवणं त्यासाठी वाईट पर्याय नसल्याचंही सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘समूह प्रतिकारशक्ती’पासून देश अद्याप दूरच!

यावेळी त्यांनी डेल्टा प्लस विषाणूसंबंधी बोलताना विषाणूंच्या परिवर्तनाचा पुढील अभ्यास करण्यासाठी करोनाविराधातील लढाईत नव्याने रुपरेषा आखण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. “आपण अनलॉक करत असताना पुन्हा एकदा लोकांकडून करोनासंबंधित सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून आपण धडा घेतलेला दिसत नाही. पुन्हा एकदा गर्दी होत आहे, लोक एकत्र येत आहेत. राष्ट्रीय स्तरावर रुग्णसंख्या वाढण्यास काही वेळ लागेल. पण तिसरी लाट अपरिहार्य असून पुढील सहा ते आठवड्यात येऊ शकते…जास्त काळही लागू शकतो,” असं यावेळी रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.

“करोना अजून संपलेला नाही, तो रंग बदलतोय”, AIIMS प्रमुखांचा इशारा!

दरम्यान यावेळी त्यांनी आपण गर्दी रोखण्यासाठी तसंच करोनासंबंधि सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यासंबंधी काय भूमिका घेतो यावर सगळं अवलंबून असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. देशातील पाच टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस मिळाले असून लसीकरण पूर्ण झालं आहे. वर्षअखेरपर्यंत १०८ कोटी लोकसंख्येचं लसीकरण करण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य आहे.

लसीकरण मुख्य आव्हान

“लसीकरण हे मुख्य आव्हान आहे. नवी लाट तीन महिन्यांचा कालावधी घेऊ शकते, पण इतर गोष्टींवर अवलंबून असल्याने ही वेळमर्यादा कमीदेखील होऊ शकते. करोनासंबंधित नियमांसोबतच लक्ष ठेवणंही महत्वाचं आहे. गेल्यावेळी नवा विषाणू जो बाहेरुन आला आणि येथे विकसित झाला यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली. हा विषाणू सतत बदलत राहणार आहे. हॉटस्पॉटच्या ठिकाणी आक्रमकपणे काम करण्याची गरज आहे,” असं रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.

….मिनी लॉकडाउन लावण्याची गरज

“रुग्णसंख्या वाढत असणाऱ्या तसंच पाच टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या देशातील कोणत्याही भागात मिनी लॉकडाउन लावण्याची गरज आहे. लसीकरण होत नाही तोवर येणाऱ्या महिन्यांमध्ये आपण असुरक्षित आहोत,” हे यावेळी त्यांनी अधोरेखित केलं. हॉटस्पॉटच्या ठिकाणी टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रिटिंग यावर मुख्य लक्ष असलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.

अनलॉक करत असताना लोकांचं वर्तन महत्वाचा मुद्दा असल्याचं सांगताना विषाणू सतत बदलत असल्याने आपण काळजी घेणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले आहेत. तसंच लाटांमधील अंतर कमी होणं चितेंची बाब असल्याचं ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात ८ लाख अॅक्टिव्ह रुग्ण असतील

“भारतात पहिल्या लाटेत व्हायरस इतक्या वेगाने पसरत नव्हता. दुसऱ्या लाटेत हे सगळं बदललं आणि व्हायरस जास्त संसर्गजन्य झाला. आता डेल्टा व्हायरस जास्त संसर्गजन्य असून वेगाने पसरत आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेत आठ लाख अॅक्टिव्ह रुग्ण असतील असं तज्ज्ञांनी सांगितलं असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 third wave could hit india in 6 to 8 weeks says aiims chief sgy
First published on: 19-06-2021 at 11:33 IST