चीनमध्ये करोनाने पुन्हा एकदा कहर केला असून अनेक शहरं लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. सोमवारी चीनला आपलं सर्वात मोठं शहर असणाऱ्या शांघाईमधील अनेक भागांमध्ये लॉकडाउन करावा लागला आहे. एकीकडे चीनकडून करोनाला रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली जात असताना दुसरीकडे याचा अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामावरुन टीका केली जात आहे. AP ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
शांघाईमधील पुडाँग हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचा भाग असून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर सोमवार ते शुक्रवार लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रशासनाने यासंबंधी माहिती दिली आहे.
लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात शहराला दोन भागात विभाजणाऱ्या Huangpu River मधील पश्चिम भागात पाच दिवसांचा लॉकडाउन केला जाणार आहे. नागरिकांना घरातच थांबावं लागणार असून इतरांशी संपर्क होऊ नये यासाठी सामान चेक पॉइंटवर ठेवलं जाणार आहे. अत्यावश्यक नसणारी कार्यालयं आणि सर्व व्यवसाय बंद राहतील. तसंच सार्वजनिक वाहतूक बंद केली जाणार आहे.
याआधीच चीनमध्ये २.५ कोटींहून जास्त लोकांना लॉकडाउनध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना करोनासाठी अनेक चाचण्या कराव्या लागत आहेत. शांघाईमधील डिस्ने थीम पार्क याआधी बंद करण्यात आलेल्या व्यवसायांपैकी एक आहे.
चीनमधील करोना रुग्णसंख्या
चीनमध्ये या महिन्यात ५६ हजारांपेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद झाली आहे. जिलिनमधील ईशान्य प्रांतांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. शांघाईमध्ये त्या तुलनेत कमी रुग्ण आहेत. शनिवारी येथे ४७ रुग्णांची नोंद झाली.
चीनची शून्य करोना रुग्ण मोहिम
चीनमधील गेल्या दोन वर्षातील सर्वात वाईट परिस्थिती असून बिजिंगकडून शून्य रुग्ण व्हावेत यासाठी मोहिम अवलंबली जात आहे. याला करोनाविरोधातील सर्वात फायदेशीर आणि प्रभावी प्रतिबंधक धोरण सांगितलं जात आहे.
यामध्ये लॉकडाउन आणि मोठ्या प्रमाणात चाचण्यांची गरज असून संपर्कात आलेल्यांना घऱी किंवा सरकारी ठिकाणी क्वारंटाइन केलं जात आहे. या धोरणामध्ये शक्य तितक्या लवकर व्हायरसचे समुदाय संक्रमण निर्मूलन करण्यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे. यासाठी शहरंही लॉकडाउन केली जात आहेत.
राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यासह अधिकार्यांनी अधिक उपाय केले जावेत असं सांगितलं जात असलं तरी उद्रेक रोखण्यात अयशस्वी झाल्याच्या आरोपावरून काढून टाकल्याबद्दल किंवा अन्यथा शिक्षा होण्याशी संबंधित स्थानिक अधिकारी अधिक टोकाचा दृष्टिकोन बाळगतात.