ओमायक्रॉनने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणांना खडबडून जागं केलं असून या पार्श्वभूमीवर पूर्ण काळजी घेतली जात आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेतून धडा घेतलेल्या केंद्र सरकारने राज्यांना महत्वाच्या सूचना केल्या असून गरज लागली तर नाईट कर्फ्यू लावा असा आदेशच दिला आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमयक्रॉन तीन पट संसर्गजन्य असून त्याला रोखण्यासाठी वॉर रुमची गरज असल्याचंही केंद्राने राज्यांना सांगितलं आहे. केंद्राने राज्यांना काही सूचना केल्या असून यामध्ये मोठ्या प्रमाणात चाचणी, नाईट कर्फ्यू आणि गर्दीवर नियंत्रण अशा मुद्द्यांचा उल्लेख आहे.
आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र पाठवलं असून स्थानिक परिस्थितीनुसार काळजी घ्यावी असं सांगितलं आहे. तसंच गरज लागल्यास मार्गदर्शक तत्वे जाहीर करावी असंही म्हटलं आहे. गेल्या आठवड्यातील पॉझिटिव्हीटी रेट १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास किंवा ऑक्सिजन तसंच आयसीयू बेडसाठी ४० टक्के व्याप्ती असेल तर ही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जाऊ शकतात असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.
दरम्यान राज्य आणि केंद्रशासित प्रदेश त्यांना योग्य वाटत असल्यास त्याआधीदेखील निर्णय घेऊ शकतात असं केंद्राने स्पष्ट केलं आहे. ओमायक्रॉनसोबतच देशातील अनेक भागांमध्ये अद्यापही डेल्टा उपस्थित आहे असं यावेळी केंद्राने अधोरेखित केलं.
केंद्राने यावेळी पत्रात दूरदृष्टी, डेटा विश्लेषण, महत्वाचे निर्णय घेणे आणि कठोर तसंच त्वरित प्रतिबंधात्मक कारवाई यासंबंधी उल्लेख केला आहे. राज्य आणि केंद्राशासित प्रदेशांना तसंच जिल्हा स्तरावर अत्यंत तत्परतेने आणि लक्ष देऊन उपाय आणि कठोर निर्बंधांसंबंधी निर्णय घेण्याची गरज असल्याचंही पत्रात म्हटलं आहे.
केंद्राने यावेळी दारोदारी जाऊन रुग्णांचा शोध घेणे आणि करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्वांची माहिती घेण्यासंबंधी सुचवलं आहे. जिनोम सिक्वेन्सिंगसाठी क्लस्टर इन्फेक्शनचे नमुने ताबडतोब INSACOG लॅबमध्ये पाठवले पाहिजेत असंही सांगण्यात आलं आहे.
१०० टक्के लसीकरण होईल यासाठी राज्यांनी जास्त प्रयत्न करावेत असं यावेळी सुचवण्यात आलं आहे. तसंच हॉस्पिटल बेड्स, रुग्णवाहिका, ऑक्सिजन सामग्री, औषधं अशा आरोग्यासंबंधी पायासुविधांसाठी आपत्कालीन निधीचा वापर करण्यासंबंधीही सुचवण्यात आलं आहे.
देशात ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २०० च्या पुढे गेली असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक ओमायक्रॉनचे ५४ रुग्ण आढळले आहेत. यानंतर तेलंगणा (२०), कर्नाटक (१९), राजस्थान (१८), केरळ (१५) आणि गुजरात (१४) यांचा समावेश आहे. यामधील ७७ रुग्ण उपचारानंतर बरे किंवा स्थलांतरित झाले आहेत.