ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने सोमवारी प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार दुसऱ्या महायुद्धानंतर या करोना महामारीमुळे आयुर्मानात सर्वात मोठी घट आली आहे. २०२० मध्ये, अमेरिकन पुरुषांचं आयुर्मान दोन वर्षांनी घटलं आहे. अभ्यास केलेल्या २९ देशांपैकी २२ देशांमधील लोकांच्या आयुर्मानात २०१९ च्या तुलनेत सहा महिन्यांची घट झाली आहे. या अभ्यासानुसार २०२० मध्ये देशभरातील बहुतांश आयुर्मान कमी होण्याचा थेट संबंध हा करोना मृत्यूंशी जोडलं जाऊ शकतो.

करोना महामारी सुरू झाल्यापासून जगभरात जवळपास ५० लाखांहून अधिक करोना मृत्यूंची नोंद झाली आहे. “आमचे निकाल हे थेट करोनाशी संबंधित धोक्यांवर प्रकाश टाकतात. हे अनेक देशांसाठी किती विनाशकारी आहे हे दर्शवते,” असं डॉ. रिद्धी कश्यप यांनी रॉयटर्सच्या अहवालात म्हटलं आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपिडेमिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासाचं त्यांनी सह-नेतृत्व केलं होतं.

महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या आयुर्मानात मोठी घट

अभ्यासलेल्या बहुतेक देशांतील महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या आयुर्मानात मोठी घट झाली आहे. अमेरिकन पुरुषांच्या आयुर्मानात २.२ वर्षांची सर्वात मोठी घट नोंदवली गेली आहे. तर, १५ देशांमध्ये पुरुषांचं आयुर्मान मोठ्या प्रमाणात घटलं आहे. मात्र, दुसरीकडे सर्वेक्षण केलेल्या ११ देशांमध्ये महिलांच्या आयुर्मानात देखील मोठी घट नोंदवण्यात आली आहे.

वय

अमेरिकेत प्रामुख्याने कार्यालयीन वयोगटातील लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. तर, युरोपियन राष्ट्रांमध्ये ६० पेक्षा जास्त वयोगटाच्या लोकांमध्ये मृत्युदर वाढवण्याचं प्रमाण लक्षणीय आहे.

डॉ. रिद्धी कश्यप यांनी कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या राष्ट्रांसह इतर देशांना पुढील अभ्यासासाठी मृत्युदराचा तपशील उपलब्ध करून देण्याचं आवाहन केलं आहे. “आम्ही जागतिक पातळीवर करोना महामारीचे परिणाम अधिक योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी अधिक वेगळ्या डेटाच्या प्रकाशन आणि उपलब्धतेची मागणी करतो,” असं रॉयटर्सने म्हटलं आहे.