पीटीआय, नवी दिल्ली

उपराष्ट्रपतीपदासाठी मंगळवारी, ९ सप्टेंबरला निवडणूक होत असून यासाठी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी यांची तयारी सुरू आहे. दोन्ही बाजूंचे खासदार सोमवारी मतदानाची तालीम करणार आहेत. मंगळवारी मतदानादरम्यान कोणतीही चूक होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी ही निवडणूक होत आहे.

सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सी. पी. राधाकृष्णन हे रालोआचे तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवार दाक्षिणात्य आहेत. राधाकृष्णन हे तमिळनाडूचे तर रेड्डी तेलंगणचे आहेत.

रालोआचे खासदार मंगळवारी संसद कार्यशाळेत सहभागी होतील. त्यावेळी ही मतदानाची तालीम घेतली जाईल. तर, ‘इंडिया’ आघाडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये सोमवारी दुपारी २.३० वाजता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाची तालीम होईल. त्यापूर्वी सदस्यांना मतदान करण्याची पद्धत समजावून सांगितली जाईल.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य मतदान करतात. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी संध्याकाळी इंडिया आघाडीच्या सदस्यांसाठी भोजन समारंभ आयोजित केला होता. मात्र, उत्तर भारतातील पूरस्थिती लक्षात घेऊन हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

मतदानामध्ये त्यात लोकसभेचे ५४३ आणि राज्यसभेचे २३३ आणि राज्यसभेचे राष्ट्रपतींद्वारे नियुक्त १२ असे एकूण ७८१ खासदार सहभागी होतील. विरोधी इंडिया आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नसले तरी ही विचारसरणी आणि तत्त्वाची लढाई असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

निवडणूक प्रक्रिया

राज्यसभेचे सरचिटणीस पी सी मोदी हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी असतील. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संसद भवनात मतदान होणार असून ते मंगळवारी सकाळी १० वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ असेल. मतमोजणी संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल आणि त्यानंतर लगेचच निकाल जाहीर केला जाईल.