15th Vice President of India Oath Taking Ceremony: नुकत्याच पार पडलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन यांनी विजय मिळवला होता. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ दिली. या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. शपथविधीनंतर लगेचच उपराष्ट्रपती राधाकृष्णन दुपारी १२:३० वाजता राज्यसभेतील सर्व नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत.
दरम्यान राजीनाम्यानंतर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे पहिल्यांदाच एखाद्या सार्वजिनिक कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. तत्पूर्वी सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर जगदीप धनखड यांनी त्यांना पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. धनखड यांनी २१ जुलै रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिला होता.
यापूर्वी, जगदीप धनखड यांनी राधाकृष्णन यांना अभिनंदन करणाऱ्या पत्रात लिहिले होते की, “आदरणीय राधाकृष्णन जी, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. या प्रतिष्ठित पदावरील तुमची निवड आपल्या देशाच्या लोकप्रतिनिधींचा तुमच्यावर असलेला आत्मविश्वास दर्शवते. सार्वजनिक जीवनातील तुमच्या प्रचंड अनुभवामुळे, तुमच्या नेतृत्वाखाली या प्रतिष्ठित पदाला निश्चितच अधिक आदर आणि गौरव मिळेल. या महत्त्वाच्या प्रसंगी, तुमच्या यशस्वी कार्यकाळासाठी आणि आपल्या महान देशच्या सेवेसाठी माझ्या शुभेच्छा.”
एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवून ते भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा १५२ मतांनी पराभव केला. राधाकृष्णन यांना एकूण ४५२ मते मिळाली तर रेड्डी यांना ३०० मते मिळाली होती.
२०२२ मध्ये झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत एकूण ७२५ खासदारांनी मतदान केले होते. त्यापैकी एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांना ५२८ आणि विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना १८२ मते मिळाली होती. तर, १५ मते अवैध ठरली होती. धनखड यांनी विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा ३४६ मतांनी पराभव केला होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला होता.