ऋषिकेश बामणे

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक संघाचा सर्वोत्तम फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो, असे म्हटले जाते. परंतु चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाने परिस्थितीनुसार केलेल्या फलंदाजीमुळे आपले स्थान अधोरेखित केले आहे. यंदाच्या विश्वचषकातही आतापर्यंत सलामीवीर आणि तिसऱ्या स्थानावरील फलंदाजांचे वर्चस्व दिसून आले आहे. मात्र संघाचा विजय आणि पराजय यामधील फरक ठरणारा चौथा फलंदाज सर्वामध्ये वेगळा ठरतो आहे.

डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यावरील निलंबन, दुखापतींमुळे बहुतांश स्पर्धाना मुकणारा मिचेल स्टार्क यांसारख्या विविध समस्यांमुळे ग्रासलेल्या ऑस्ट्रेलियाने अनपेक्षित भरारी घेताना विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र वॉर्नर आणि आरोन फिंचशिवाय चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या स्मिथचेही संघाच्या विजयात तितकेच योगदान लाभत आहे. सामन्याच्या परिस्थितीनुसार स्मिथचा क्रम ठरवण्यात येतो. आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यांपैकी पाच डावांत स्मिथने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तीन अर्धशतकांसह २८७ धावा केल्या आहेत. २०१५च्या विश्वचषकात सलग पाच अर्धशतके झळकावणाऱ्या स्मिथच्या फलंदाजीत आता पूर्वीसारखी जादू राहिली नाही, असे अनेकांचे मत असले तरी दडपणाच्या परिस्थितीत हाच लढवय्या ऑस्ट्रेलियाला विजयी दिशा दाखवेल, यात काडीचीही शंका नाही.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने मोक्याच्या क्षणी संघाला सामने जिंकून दिले आहेत. परंतु चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या अनुभवी रॉस टेलरचे योगदान विसरता येणार नाही. ३५ वर्षीय टेलर कारकीर्दीतील तिसरा विश्वचषक खेळत असून त्याच्याकडे २२७ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे. एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीतील फलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानी असलेल्या टेलरने चालू विश्वचषकातील नऊ सामन्यांपैकी सात डावांत दोन अर्धशतकांसह २६१ धावा केल्या आहेत. त्याशिवाय दडपणाच्या परिस्थितीत विल्यमसन सर्वप्रथम संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडू टेलरचेच मार्गदर्शन घेतो. टेलरच्या कामगिरीचा कधीच मोठय़ाने गाजावाजा झाला नसला तरी न्यूझीलंड क्रिकेटने क्रीडाविश्वाला दिलेल्या ताऱ्यांच्या यादीत त्याचे नाव नक्कीच वरच्या क्रमांकावर असेल.

२०१५च्या विश्वचषकात इंग्लंडला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. साखळीतील अखेरच्या लढतीतील बांगलादेशविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गनने स्वत: पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि सहकाऱ्यांसह संघ व्यवस्थापनाला त्याच्यावर विश्वास ठेवण्यास विनंती करून नव्या इंग्लंड संघाला घडवण्याचे वचन दिले. तेव्हापासून गेली चार वर्षे मॉर्गन कर्णधार आणि फलंदाज या दोन्ही भूमिका यशस्वीपणे पेलत असून इंग्लंडला पहिल्यावहिल्या विश्वचषकाची उमेद दाखवत आहे. विश्वचषकाच्या सुरुवातीला जो रूट, जोस बटलर, जेसन रॉय असे एकापेक्षा एक मातब्बर फलंदाज संघात असल्यामुळे मॉर्गनविषयी फारशी चर्चा कोणी करीत नव्हते. परंतु अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात तब्बल १७ षटकारांसह साकारलेल्या १४८ धावांच्या वादळी खेळीने सर्वानाच मॉर्गनच्या फलंदाजीच्या प्रेमात पाडले. सात डावांत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन मॉर्गनने आतापर्यंतच्या नऊ सामन्यांत प्रत्येकी एक शतक व अर्धशतकासह ३१७ धावा केल्या असून एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्यामुळे मॉर्गनच्या कल्पक नेतृत्वाबरोबरच तो फलंदाजीत किती योगदान देतो, यावरच इंग्लंडचे स्पर्धेतील भवितव्य अवलंबून आहे.

भारतापुढील प्रश्नचिन्ह कायम!

विश्वचषकाचा महासंग्राम आता उपांत्य फेरीच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. परंतु भारतीय संघामागील चौथ्या क्रमांकाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. गेली दोन वर्षे सुरेश रैना, श्रेयस अय्यर, अंबाती रायुडू यांसारख्या फलंदाजांची चाचणी केल्यानंतर भारताने लोकेश राहुलला पसंती दर्शवली. राहुलनेही त्या क्रमावर बऱ्यापैकी फलंदाजी केली. मात्र शिखर धवन दुखापतीमुळे बाहेर गेला आणि पुन्हा एकदा भारताची डोकेदुखी वाढली. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात विजय शंकरने केलेली फलंदाजी चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाला साजेशी नव्हती. दुर्दैवाने तोही दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आणि ऋषभ पंतसारख्या नवख्यावर भलीमोठी जबाबदारी येऊन पडली. मात्र तूर्तास तरी भारताने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले असून गरजेनुसार त्यांनी हार्दिक पंडय़ा, पंत यांच्याभोवती चौथा क्रमांकाची समस्या लपवण्याचा प्रयत्न केला. परंतु उपांत्य फेरीसारख्या महत्त्वपूर्ण सामन्यात (कदाचित अंतिम फेरीतही) भारताला त्या स्थानावर अनुभवी व संयमी फलंदाज नसल्याचा फटका पडू शकतो.

एकदिवसीय सामन्यांत कमी षटके उपलब्ध असल्याने संघातील प्रमुख फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. त्यामुळे चौथ्या क्रमांकाचे महत्त्व कमी होत नाही. भारताला अद्यापही या विश्वचषकात चौथ्या क्रमांकावरील फलंदाज गवसलेला नाही. मात्र उर्वरित सामन्यांत दिनेश कार्तिकला आपण चौथ्या स्थानावर फलंदाजीला पाठवू शकतो. कार्तिक हा संयमी फलंदाज असून तो गरजेनुसार धावगतीसुद्धा वाढवू शकतो. त्यानंतर पंत, पंडय़ा आणि धोनी असा क्रम ठेवावा.

– सुलक्षण कुलकर्णी, प्रशिक्षक