पीयूष रानडे
लहान असताना बाबांनी पहिल्यांदा सिझन बॉल आणून दिला आणि त्याच्या पहिल्याच फटक्यात मी एका घराची काच फोडली होती. आमच्या सोसायटीबाहेर असलेल्या मैदानात आम्ही खेळपट्टी बनवली होती. हे करण्यामागे क्रिकेटचे वेड कारणीभूत होते. बडोद्यातील वातावरण क्रिकेटसाठी अधिक पोषक असल्याने घरच्यांचाही पाठिंबा होता. पूर्वी पहाटे सामने खेळले जायचे. तेव्हा मी आणि माझे आजोबा आम्ही मध्यरात्री उठून सामने पाहिले आहेत. किरण मोरे, नयन मोंगिया, युसूफ पठाण हे क्रिकेटपटू बडोद्यात असताना माझे मित्र होते. आम्ही एकत्र मिळून क्रिकेट खेळलो आहोत. मी स्वत: राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल खेळलो आहे. प्रत्येक खेळ मी त्याच आवडीने पाहत असलो तरी क्रिकेट हे पहिले प्रेम आहे, हे मात्र नाकारता येत नाही. आजही सेटवर असताना मेकअप रूममध्ये राहण्यापेक्षा बाहेर पडून क्रिकेट खेळणे जास्त पसंत करतो. अगदी रविवारी घरी असलो तरी सोसायटीतील लहान मुलांसोबत क्रिकेट खेळून आनंद मिळवतो. यंदाचा विश्चषक पाहता इंग्लंड आणि भारत या दोन संघांमध्ये अंतिम सामना होईल, असा अंदाज आहे. भारतीयम् संघ पूर्वीसारखा कोण्या एका खेळाडूवर अवलंबून नाही. आता सगळेच तितक्याच ताकदीचे आहेत.
(शब्दांकन : निलेश अडसूळ)
