श्रीलंकेविरुद्धची आजची लढत म्हणजे उपांत्य फेरीची रंगीत तालीम

लीड्स : भारतीय संघासाठी शनिवारी होणारी श्रीलंकेविरुद्धची साखळीतील अखेरची लढत म्हणजे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीला सामोरे जाण्यापूर्वीची रंगीत तालीमच आहे. इंग्लंडविरुद्धच्या पराभवाचा अपवाद वगळल्यास भारतीय संघाने विजयी आवेशात बाद फेरी गाठली असली तरी मधली फळी आणि महेंद्रसिंह धोनीची फलंदाजी या चिंता कायम आहेत.

ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची अखेरची लढत गमावल्यास विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धची लढत जिंकून गुणतालिकेतील अव्वल स्थान प्राप्त करता येऊ शकते. भारताला अग्रस्थान मिळाल्यास उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी सामना होईल, तर दुसरे स्थान मिळाल्यास यजमान इंग्लंडशी गाठ पडेल. त्यामुळे धोकादायक इंग्लंडपेक्षा न्यूझीलंडचे आव्हान तुलनेने सोपे असेल.

न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे झाला नाही. हा सामना वगळल्यास उर्वरित सात सामन्यांत भारतीय संघाला मधल्या फळीचा गुंता सुटलेला नाही. आघाडीच्या फळीच्या यशावरच भारतीय संघाची फलंदाजी मोठय़ा प्रमाणात विसंबून आहे. त्यामुळे मधल्या फळीचे सामर्थ्य वाढवण्यासाठी रवींद्र जडेजाला संधी मिळू शकते. नुकत्याच इंग्लंडमध्ये दाखल झालेला सलामीवीर मयांक अगरवालचा अपवाद वगळता जडेजा या एकमेव भारतीय खेळाडूला अद्याप यंदाच्या विश्वचषकात संधी मिळालेली नाही. श्रीलंकेच्या संघात बरेच डावखुरे फलंदाज असल्यामुळे जडेजाऐवजी केदार जाधवला पुन्हा संघात स्थान मिळू शकते.

धोनी अपेक्षा पूर्ण करणार?

अखेरच्या षटकांमध्ये प्रसंगानुरूप खेळून विजयवीराची भूमिका वठवणारा धोनी विश्वचषकामध्ये अपेक्षांची पूर्तता करू शकलेला नाही. धोनीने सात सामन्यांत २२३ धावा केल्या असल्या तरी तो अखेरच्या षटकांमध्ये चाचपडताना आढळत आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात लसिथ मलिंगाच्या वेगवान माऱ्यासमोर धोनीच्या अनुभवाचा कस लागणार आहे. धोनीने आतापर्यंतच्या सामन्यांमधील फिरकी गोलंदाजांच्या ८१ चेंडूंचा सामना करीत फक्त ४७ धावा केल्या आहेत. त्यामुळे धोनीचे कच्चे दुवे अधोरेखित होत आहेत. श्रीलंकेच्या गोलंदाजीची मदार ऑफ-स्पिनर धनंजय डी’सिल्व्हावर आहे. त्यामुळे डी’सिल्व्हाच्या गोलंदाजीचा आत्मविश्वासाने सामना करून धोनी आत्मविश्वास उंचावू शकतो. डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीचा सामना करणे धोनीसाठी आव्हानात्मक ठरते. त्यामुळे श्रीलंकेचा कर्णधार दिमूथ करुणारत्ने मिलिंदा सिरिवर्दनाचा योग्य वापर करू शकतो. परंतु विराटसह संपूर्ण संघाचा धोनीच्या मार्गदर्शनावर विश्वास आहे.

रोहित विक्रमी शतक साकारणार?

भारताच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने उपकर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीवर अवलंबून आहे. त्याच्या खात्यावर ५४४ धावा आणि चार शतके जमा आहेत. श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या एका विश्वचषकामधील सर्वाधिक शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करणारा रोहित श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हा विक्रम मोडित काढू शकतो. अफगाणिस्तान (१) आणि वेस्ट इंडिज (१८) यांच्याविरुद्ध रोहित अपयशी ठरला होता. रोहितने तीन एकदिवसीय द्विशतकांपैकी दोन श्रीलंकेविरुद्ध झळकावली आहेत. त्यामुळे रोहितला जेरबंद करण्यासाठी श्रीलंकेला त्याचा मुंबई इंडियन्सचा साथीदार मलिंगाचा प्रभावी वापर करावा लागणार आहे. रोहितला विराट (४०८ धावा) आणि लोकेश राहुल (२४९ धावा) यांच्याकडून तोलामोलाची साथ लाभत आहे. विराटने विश्वचषकामध्ये पाच अर्धशतके झळकावली आहेत.

वेगवान माऱ्यात बदल?

जगातील सर्वोत्तम वेगवान मारा हे बिरुद भारतीय गोलंदाजांनी विश्वचषकात सार्थ ठरवले आहे. यॉर्कर विशेषज्ञ जसप्रीत बुमरा (१४ बळी) या वेगवान माऱ्याचे नेतृत्व करीत असून, मोहम्मद शमीने (१४ बळी) त्याला दुसऱ्या बाजून अप्रतिम साथ दिली आहे. भुवनेश्वर कुमार (६ बळी) आणि हार्दिक (८ बळी) हेसुद्धा आपली भूमिका चोख बजावत आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी बुमरा आणि शमी यांच्यापैकी एकाला विश्रांती मिळण्याची दाट शक्यता आहे.

चौथ्या स्थानावर कोण?

सलामीवीर शिखर धवन माघारी परतल्यामुळे भारताने लोकेश राहुलला सलामीची जबाबदारी सोपवली. त्यानंतर भारताला चौथ्या क्रमांकाचा तिढा सोडवता आलेला नाही. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी धोनीला

चौथ्या क्रमांकावर पाठवण्याचा विचार होऊ शकतो. ऋषभ पंत आणि हार्दिक पंडय़ा यांनी आपला नैसर्गिक खेळाचे प्रदर्शन करताना फटक्यांची आतषबाजी केली आहे. परंतु मोठी धावसंख्या रचण्यात ते अपयशी ठरले आहे. दुखापतीमुळे मायदेशी परतलेल्या विजय शंकरने चौथ्या स्थानावर फलंदाजी केली होती. परंतु त्याच्या जागी आपण सलामीवीर मयांकला संघात स्थान दिले आहे.

श्रीलंकेची मदार मलिंगावर

श्रीलंकेच्या गोलंदाजीची धुरा अनुभवी मलिंगा समर्थपणे निभावत आहे. त्याने सहा सामन्यांत १२ बळी मिळवले आहेत. याचप्रमाणे फलंदाजीची मदार कुशल परेरा (सहा सामन्यांत २५५ धावा) आणि करुणारत्ने (सहा सामन्यांत २१२ धावा) यांच्यावर आहे. याशिवाय अविष्का फर्नाडोने तीन सामन्यांत १८३ धावा केल्या आहेत.

सामना क्र. ४४

भारत वि. श्रीलंका

’स्थळ : हेडिंग्ले, लीड्स  ’सामन्याची वेळ :दुपारी ३ वा.

’थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २,

स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मयांक अगरवाल, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत.

श्रीलंका : दिमुथ करुणारत्ने (कर्णधार) लसिथ मलिंगा, अविष्का फर्नाडो, लाहिरु थिरिमाने, कुसल परेरा, कुसल मेंडिस, अ‍ॅँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी’ सिल्व्हा, जेफ्री वॅँडरसे, थिसारा परेरा, इसुरू उडाना, सुरंगा लकमल, कसून रजिता, जीवन मेंडिस, मिलिंदा सिरिवर्दना.

आमनेसामने

एकदिवसीय    

सामने : १५८, भारत : ९०,

श्रीलंका: ५६, टाय / रद्द : १/११

विश्वचषकात   

सामने : ८, भारत : ३,

श्रीलंका: ४, टाय / रद्द : ०/१

खेळपट्टीचा अंदाज

हेडिंग्लेवरील पहिल्या दोन सामन्यांत खेळपट्टीने फिरकी गोलंदाजांना चांगली साथ दिली. परंतु मागील सामन्यात फिरकीच्या ३९ षटकांमध्ये फक्त तीन बळी मिळाले. या सामन्यात एकूण ५९९ धावांची बरसात झाली होती. त्यामुळे मोठय़ा धावसंख्येचा सामना होऊ शकेल. धावांचा पाठलाग करणे कठीण ठरत असल्याने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी स्वीकारणे योग्य ठरेल.