भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीसंतने अकादमी सुरू करण्याच्या बहाण्याने उत्तर केरळ येथील कन्नूर जिल्ह्यातील एका गुंतवणूकदाराची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यासह इतर दोघांवरही गुन्हे दाखल झाले आहेत.
सुरेश गोपालन यांनी ही तक्रार केली होती. ते चुंडा येथील रहिवासी असून आरोपी राजीव कुमार आणि व्यंकटेश किणी यांनी २५ एप्रिल २०१९ पासून कर्नाटकातील कोल्लूर येथे स्पोर्ट्स अकादमी बांधणार असल्याचे सांगून विविध तारखांना १८.७० लाख रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. यामध्ये श्रीसंतही भागिदार आहे. सरेश गोपालनने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, अकादमीमध्ये भागीदार बनण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी पैसे गुंतवले.
श्रीसंत आणि इतर दोघांवर आयपीसी कलम ४२० (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेचे वितरण) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, या प्रकरणातील तिसरा आरोपी म्हणून श्रीसंतचे नाव आहे.