Crime News : रुग्णालयात रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. त्यांना आधाराची गरज असते, शिवाय त्यांना डॉक्टरांकडून दिलासा हवा असतो. मात्र रुग्णालयातही कधी कधी त्यांना वाईट किंवा धक्कादायक अनुभव येतात. अशीच एक घटना समोर आली आहे. कॅन्सरग्रस्त महिला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाली. तिच्या बरोबर तिची मुलगीही होती. ही मुलगी अंघोळीसाठी गेली असताना तिचा व्हिडीओ चित्रीत करण्यात आला आणि तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यात आलं. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातल्या मेरठमध्ये घडली आहे.

नेमकी ही घटना काय घडली?

उत्तर प्रदेशातल्या मेरठमध्ये एक महिला कॅन्सर झाल्याने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाली. तिच्यासह तिची मुलगीही होती. ११ जूनला ही महिला रुग्णालयात दाखल झाली. त्या महिलेसह तिची मुलगी होती. ती आपल्या आईची काळजी घेत होती. २८ जूनला मुलीच्या मोबाइलवर एक फोन आला आणि त्या माणसाने तिला सांगितलं तुला Whats App वर एक व्हिडीओ पाठवला आहे तो बघ. तो व्हिडीओ मेडिकल रुग्णालयातील बाथरुममध्ये ही मुलगी अंघोळीसाठी गेली असताना चित्रीत केलेला होता. हा व्हिडीओ पाहून मुलीला धक्काच बसला. यानंतर आरोपीने मुलीला शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. तू असं केलं नाहीस तर तुझा हा व्हिडीओ व्हायरल करेन असं त्या मुलीला आरोपीने सांगितलं. ज्यानंतर मुलीने ही संपूर्ण घटना तिच्या कुटुंबाला सांगितली.

पोलिसांनी या प्रकरणात काय सांगितलं?

कुटुंबाने तिच्यासह पोलीस ठाणं गाठलं, पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात मेहताब नावाच्या एका २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मेहताब त्याच्या पत्नीला घेऊन रुग्णालयात आला होता. त्यावेळी त्याने कॅन्सरग्रस्त आईच्या मुलीचा व्हिडीओ चित्रीत केला होता. या प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर मेहताबला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. तसंच तो व्हिडीओ आणि ज्या दिवशी हा प्रकार घडला त्यादिवशीचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. न्यूज १८ ने हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वीही अशीच घटना घडल्याची माहिती समोर

मेरठ येथील मेडिकल रुग्णालयाच्या या आवारात एका १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. त्यापाठोपाठ आता ही नवी घटना समोर आली आहे. या प्रकरणातला आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला होता. पण त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे.