Crime News : पती आणि पत्नीचं नातं हे जगातलं विश्वासाचं आणि प्रेमाचं नातं मानलं जातं. मात्र या नात्याला कधीकधी सुरुंगही लागतो. गोष्टी इतक्या विकोपाला जातात की पती पत्नीची किंवा पत्नी पतीची हत्या करेपर्यंत पाऊल उचललं जातं. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील अलीगढ या ठिकाणी घडली आहे. युसुफ खान नावाच्या २९ वर्षीय तरुणाला त्याच्या पत्नीने चाकूचे वार करुन ठार केलं आणि त्याचा मृतदेह अॅसिडने जाळला. यासाठी तिला तिच्या प्रियकराने मदत केली अशी धक्कादायक घटना आता समोर आली आहे.
पोलिसांनी या हत्येबाबत नेमकं काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युसुफची पत्नी तब्बसुमने प्रियकराच्या मदतीने युसुफचे हात मागे बांधले. त्यानंतर त्याच्या पोटात चाकू खुपसला. त्यानंतर चाकूचे वार ती करत राहिली. ज्यानंतर युसुफची हत्या झाली. एवढ्यावरच तब्बसुम थांबली नाही. तिने युसुफचा मृतदेह अॅसिड फेकलं. त्यानंतर तो मृतदेह जाळला. कासगंज जिल्ह्यातल्या एका अज्ञात ठिकाणी युसुफच्या मृतदेहाचे अवशेष फेकून दिले.
तब्बसुमचे विवाहबाह्य संबंध ठरले युसुफच्या हत्येचं कारण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युसुफ बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबाने २९ जुलै रोजी नोंदवली होती. युसुफ कामासाठी बाहेर पडला पण घरी परतलाच नाही म्हणून ही तक्रार नोंदवण्यात आली. पोलीस युसुफ बेपत्ता झाला आहे हे समजून त्याचा शोध घेत होते. पोलीस जेव्हा तपास करत होते तेव्हा एका वीटभट्टीजवळ त्यांना एका माणसाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले. अॅसिड फेकलं गेल्याने आणि मृतदेह जाळण्यात आल्याने या अवशेषांवरुन माणूस कोण आहे ही ओळख पटवणं कठीण होतं. हे अवशेष युसुफच्या मृतदेहाचे असावेत असं समजून पोलिसांनी तपास पुढे सुरु ठेवला. त्यानंतर त्यांना दानिश आणि तब्बसूमबाबत समजलं. युसुफ दानिशला आधी भेटला होता. दोघांमध्ये मैत्री झाली होती. त्यानंतर युसुफला काम मिळावं यासाठी दानिशने प्रयत्न केले होते. या निमित्ताने दानिश युसुफच्या घरी जायचा. त्यावेळी तब्बसुम आणि दानिश यांचं सूत जुळलं. त्यातून ही हत्या घडली. युसुफच्या कुटुंबाने हा आरोप केला आहे की दानिश आणि तब्बसुमने मिळूनच युसुफची हत्या केली.
जे अवशेष पोलिसांना मिळाले होते ते वैद्यकीत तपासणीसाठी पाठवून अहवाल मागवण्यात आला. अहवालात हे स्पष्ट नमूद होतं की युसुफचे हात त्याच्यावर वार करण्याआधी बांधण्यात आले होते. शिवाय काय काय घडलं होतं हेदेखील अहवालात नमूद करण्यात आलं होतं. दरम्यान या सगळ्याबाबत पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा त्यांना युसुफच्या चुलत भाऊ मुबीनने सांगितलं की दानिश आणि तब्बसुम यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. यावरुन युसुफ आणि तब्बसुम यांच्यात वाद सुरु झाले होते. मुबीनच्या म्हणण्यानुसार युसुफच्या घरात प्रवेश मिळावा म्हणूनच दानिशने युसुफशी मैत्री केली होती. तसंच गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बसूमचं वागणंही पूर्णपणे बदललं आहे असाही आरोप मुबीनने केला. यानंतर तब्बसूमला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दानिशचा तपास सुरु आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.