Crime News : मधुचंद्रासाठी गोव्याला गेलेल्या पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. या घटनेनंतर पतीला गोव्यात सोडून पत्नी विमानाने घरी परतली आहे. त्यानंतर तिने पतीसह सासरच्या लोकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मला माझ्या पतीने मारहाण केली आणि ठार करण्याचा प्रयत्न केला असा आरोप या महिलेने केला आहे. नेमकी ही घटना काय आणि ती कुठे घडली आपण जाणून घेऊ.

नेमकी काय घडली घटना?

उत्तर प्रदेशातल्या महाराजगंज या ठिकाणी एका जोडप्याचं लग्न झालं. त्यानंतर हे दोघंही मधुचंद्रासाठी गोव्याला गेले. मात्र तिथे या दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. त्यानंतर महिलेच्या पतीने तिला मारहाण केली. आज तकच्या वृत्तानुसार पीडिता उत्तर प्रदेशातील कोतवाली या ठिकाणी राहणारी आहे. तिने सांगितल्यानुसार १२ फेब्रुवारीला तिचं लग्न झालं. तिच्या पतीचं नाव रमेश असं आहे. लग्नानंतर पती रमेश आणि त्याच्या घरातल्यांनी माझा छळ केला असा आरोप आता तिने केला आहे.

पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १९ फेब्रुवारीला सदर जोडपं हे मधुचंद्रासाठी गोव्याला गेलं होतं. यानंतर २२ फेब्रुवारीला म्हणजेच शनिवारी ही महिला रमेशला सोडून परतली. कारण मधुचंद्राच्या वेळी पती रमेशने आपल्याला मारहाण केली आणि ठार करण्याचा प्रयत्न केला असा आरोप या महिलेने केला आहे. या सगळ्या घटना घडल्यानंतर २२ फेब्रुवारीला सदर महिला तिच्या माहेरी आली. तिचं सगळं म्हणणं ऐकल्यानंतर तिच्या माहेरच्या मंडळींनी तिचा पती रमेश आणि त्याच्या घरातल्या लोकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. रमेशने माझा गळा दाबून मला ठार करण्याचा प्रयत्न केला असा आरोप या महिलेने केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस अधीक्षक सोमेंद्र मीना यांनी काय सांगितलं?

पोलीस अधीक्षक सोमेंद्र मीना यांनी सांगितलं की नवविवाहितेच्या तक्रारीनंतर आम्ही हुंड्यासाठी छळ, मारहाण या प्रकरणांत रमेशसह एकूण सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आम्ही पुढील चौकशी करत आहोत. या प्रकरणातील पीडितेचा पती रमेश हा पेशाने डॉक्टर आहे. या दोघांचं लग्न नुकतंच झालं होतं. दोघंही मधुचंद्रासाठी गोवा या ठिकाणी गेले होते. मात्र महिलेने पती रमेशकडून मारहाण, छळ होत असल्याचं तिच्या घरातल्या लोकांना सांगितलं. ज्यानंतर तिला २२ तारखेला घरी बोलवण्यात आलं. एखाद्या चित्रपटाची कथा वाटेल अशी काहीशी ही घटना आहे. पतीच्या छळाला आणि मारहाणीला कंटाळून ही महिला घरी परतली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.