Crime News साधारण १० ते १२ गुंडांनी एका माणसाच्या घरात घुसून त्याच्या पत्नी आणि मुलांना पळवून नेलं. या सगळ्याला त्या माणसाने विरोध केला तेव्हा त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. मध्य प्रदेशातल्या छतरपूर जिल्ह्यात ही घटना घडली. बोलेरो गाडी घेऊन आणि बाईक घेऊन हल्लेखोर आले होते. ते एका घरात शिरले. त्या घरातल्या महिलेला आणि तिच्या मुलांना त्यांनी पळवून नेलं. या घटनेचा विरोध महिलेचा पती करत होता तेव्हा त्याला लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यात आली आणि त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. या हल्ल्यात तो जखमी झाला. आता पोलीस या प्रकरणी या माणसाच्या पत्नीचा आणि मुलांचा शोध घेत आहेत. हल्लेखोरांना ओळखणाऱ्या, त्यांचा पत्ता सांगणाऱ्यांना पोलिसांनी १० हजार रुपये बक्षीसही जाहीर केलं आहे.
नेमकी घटना काय घडली?
मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातल्या शुमेडी गावात हरिराम पाल यांचं घर आहे. त्यांच्या घरात साधारण डझनभर लोक घुसले. त्या हल्लेखोरांनी हरिराम पाल यांच्या पत्नीला आणि मुलांना पळवून नेलं. हरिराम पाल विरोध दर्शवत होते. मात्र त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांच्यावर गोळीही झाडण्यात आली. हरिराम पाल या घटनेत जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आत्तापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी इतर हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे आणि त्यांच्यावर दहा हजारांचं बक्षीसही जाहीर केलं आहे. ही घटना छतरपूर येथील शुमेडी गावातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचं नाव संजय सिंह असं आहे. संजय सिंह हरिराम यांच्याच गावातला आहे. या दोघांचा जुना वाद होता. त्यातून हे कृत्य त्याने केल्याचं समजतं आहे. १५ जणांसह संजय सिंह तिथे आला होता. त्याने हरिराम यांना मारहाण केली, त्यांच्यावर गोळी झाडली. तर त्यांच्या पत्नीला आणि मुलांना पळवून घेऊन गेला. हरिराम यांची पत्नी आणि त्यांच्या दोन मुली ज्यापैकी एक सात वर्षांची आहे तर दुसरी पाच वर्षांची या तिघींना त्याने पळवून नेलं आहे. व्हिडीओत हे दृश्य कैद झालं असून तो व्हिडीओ व्हायरलही झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने चक्रं हलवली आहेत आणि नऊ जणांच्या विरोधात मारहाण करणं, अपहरण करणं, गोळी चालवणं यासंदर्भातले गुन्हे दाखल केले आहेत. बोलेरो कार आणि बाईक हेदेखील पोलिसांनी जप्त केलं आहे. तसंच या प्रकरणी पोलीस अनेकांची चौकशीही करत आहेत. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
पोलीस अधीक्षक अगम जैन काय म्हणाले?
या घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी धाव घेतली. आरोपींना पकडण्यासाठी आम्ही पाच पथकं तयार केली आहेत आणि आऱोपींचा कसून शोध सुरु आहे. हरिराम पाल यांच्या पत्नीला आणि दोन मुलींना सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. आत्तापर्यंत आमच्या पथकांनी २५ ठिकाणी छापेमारी केली आहे अशी माहिती त्यांनी दिली.