देशात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात २०२०मध्ये तुलनेने घट

देशभरातील आकडेवारीमध्ये सर्वाधिक प्रमाण पती किंवा इतर कुटुंबीयांकडून करण्यात येणाऱ्या अत्याचारांच्या गुन्ह्यांचे असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

२०१९वर्षाच्या तुलनेत २०२०मध्ये म्हणजे करोनाच्या काळात महिलांवरील  अत्याचाराच्या नोंद गुन्ह्यांचे प्रमाण ८.३ टक्क्यांनी घटले असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने दिली आहे. दरवर्षी गुन्हेगारीचे प्रमाण वर्गवारीनिहाय ही संस्था जाहीर करीत असते.

२०२० वर्षासाठीचा गुन्हेविषयक अहवाल जाहीर झाला असून त्यानुसार  महिलांबाबतच्या गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले असले तरी याच काळात पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मात्र हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले आहे. तसेच, देशभरातील आकडेवारीमध्ये सर्वाधिक प्रमाण पती किंवा इतर कुटुंबीयांकडून करण्यात येणाऱ्या अत्याचारांच्या गुन्ह्यांचे असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

मंगळवारी जाहीर झालेल्या एनसीआरबीच्या अहवालानुसार २०१९च्या तुलनेत २०२० मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या नोंद होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये ८.३ टक्के घट झाल्याचे  दिसून आले आहे. २०१९मध्ये हा आकडा ४ लाख ५ हजार ३२६ इतका होता, २०२०मध्ये तो ३ लाख ७१ हजार ५०३ इतका खाली आला आहे.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये महिलांविरोधातील  गुन्ह्यांमध्ये घट दिसून येत आहे. दिल्लीत २०१९मध्ये १३ हजार ३९५ गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर २०२०मध्ये ती १० हजार ९३ इतकी खाली आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील हे प्रमाण ५९ हजार ८५३ वरून ४९ हजार ३८५ इतके  झाले आहे.

विशेष म्हणजे, या आकडेवारीमध्ये सर्वात कमी प्रमाण हे बलात्काराच्या गुन्ह्यांच्या नोंदींचे असून ते ७.५ टक्क्यांवर आहे. २०२०मध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या नोंद झालेल्या ३ लाख ७१ हजार ५०३ प्रकरणांपैकी ३५ हजार ३३१ प्रकरणे ही देशातील मोठ्या शहरांमध्ये घडलेली आहेत. हे प्रमाण देखील २०१९ च्या तुलनेत २१.१ टक्क्यांनी घटल्याचे स्पष्ट झाले आहे. देशात करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये पूर्णपणे टाळेबंदी लागू असल्यामुळे आकडेवारी घटल्याचे दिसून आले आहे.

५० हजारांहून अधिक सायबर गुन्ह्यांची नोंद

२०२० मध्ये देशात ५००३५ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. आदल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण ११.८ टक्क्यांनी अधिक आहे. याशिवाय, ‘समाजमाध्यमांवरील खोट्या बातम्यांच्या’ ५७८ घटनांचीही या वर्षात नोंद झाली. २०१९ साली ३.३ टक्के इतका असलेला सायबर गुन्ह्यांचा दर २०२० साली ३.७ टक्क्यांपर्यंत वाढला, असेही यात नमूद केले आहे. २०१९ साली देशात सायबर गुन्ह्यांची ४४,७३५ प्रकरणे नोंदली गेली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Crime rate against women in the country is relatively low in 2020 akp