CRPF Person Arrested for Spying: आठवड्याभरापूर्वी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं दिल्लीतून एका CRPF अधिकाऱ्याला अटक केली. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा, पाकिस्तानमधील लष्करी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. या अधिकाऱ्याची आता एनआयएकडून चौकशी केली जात असून त्यातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, एनआयएकडे हस्तांतरित करण्याआधी या अधिकाऱ्याची केंद्रीय गुप्तहेर यंत्रणेकडूनही चौकशी करण्यात आली आहे.
मोती राम जाट असं या अधिकाऱ्याचं नाव असून सीआरपीएफमध्ये तो सहायक उपनिरीक्षक पदावर कार्यरत होता. गेल्या आठवड्यात त्याला अटक केल्यानंतर सीआरपीएफनं या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं आहे. मोती राम जाटनं पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा जम्मू-काश्मीर दौरा, ५० पर्यटन स्थळं बंद करण्याचे निर्णय, सीआरपीएफच्या तळांवरील मनुष्यबळ आणि त्यांच्या हालचाली, दहशतवाद्यांचे संभाव्य ठावठिकाणे यासंदर्भातली माहिती पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना पुरवल्याचं सांगितलं जात आहे.
आर्थिक मदतीच्या मोबदल्यात माहिती!
दरम्यान, या CRPF अधिकाऱ्याच्या चौकशीतून समोर आलेली बाब म्हणजे पाकिस्तानला माहिती पुरवण्याच्या मोबदल्यात त्याला पैसे पाठवले जात होते. प्रत्येक महिन्याच्या चार तारखेला ३५०० रुपये तर महत्त्वाची महिती दिल्यास त्यासाठी १२ हजार रुपये त्याला दिले जात होते. हे पैसे त्याच्या व त्याच्या पत्नीच्या बँक अकाऊंटमध्ये जमा होत असत. गेल्या दोन वर्षांत मोती राम जाटनं अनेक प्रकारची माहिती पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांना पुरवल्याचंही आता उघड झालं आहे.
महिलेनं पत्रकार असल्याचं भासवलं!
दरम्यान, सीआरपीएफमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर अधिकाऱ्याकडून माहिती मिळवण्यासाठी एका तरुणीनं आपण चंदीगडमधील पत्रकार असून एका नामांकित वृत्तवाहिनीत कामाला असल्याचं सांगितलं होतं. सुरुवातीच्या काही मेसेजेस आणि फोन कॉल्सनंतर या अधिकाऱ्याने तिला माहिती पुरवायला सुरुवात केली. यादरम्यान दोघांमध्ये काही व्हिडीओ कॉलदेखील झाले. दोन ते तीन महिन्यांनंतर एक पाकिस्तानी गुप्तहेर अधिकारी त्याच वाहिनीतील महिला पत्रकाराचा सहकारी म्हणून या अधिकाऱ्याशी बोलू लागला.
जाटच्या फोनमध्ये संवादाचे पुरावे
मोती राम जाटच्या मोबाईलची तपासणी केली असता सदर तरुणीशी त्याने केलेल्या संवादाचे सर्व मेसेजेस त्याच्या मोबाईलमध्ये असून त्यांची चाचपणी केली जात आहे. “सुरक्षा व्यवस्था, जवानांच्या तैनातीची ठिकाणे, सीआरपीएफ दलाच्या हालचाली, मल्टिएजन्सी सेंटर अर्थात एमएसीशी निगडित अहवाल अशी अनेक प्रकारची संवेदनशील माहिती जाटनं सदर महिलेला पुरवली”, असं सीआरपीएफमधील सूत्रांनी सांगितलं.
पहलगाम हल्ल्याच्या पाच दिवस आधी बदली
दरम्यान, २२ एप्रिलला पहलगाम हल्ला होण्याच्या पाच दिवस आधीच मोती राम जाटची दिल्लीला बदली करण्यात आली होती. त्यानं दिल्लीला आल्यानंतरदेखील अमित शाह यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याची माहिती पाकिस्तानमधील हस्तकांना पुरवली होती. दरम्यान, अमित शाह यांच्या दौऱ्याबाबत जाटनं माहिती देताच समोरील व्यक्तीने जी माहिती इतर ठिकाणी नाही, अशी माहिती देण्यास त्याला सांगितल्याचीही बाब समोर आली आहे.