कडक सुरक्षा; लष्कराला सज्ज राहण्याचे आदेश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या ईददरम्यान कुठलाही हिंसाचार होऊ नये यासाठी गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यातील सर्व १० जिल्हे संचारबंदीच्या अमलाखाली राहणार आहेत.

सध्याची संवेदनशील परिस्थती लक्षात घेऊन लष्कराला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ व्यापक असंतोषाचा सामना करणाऱ्या खोऱ्यात नव्याने हिंसाचार झाल्यास लष्कर हस्तक्षेप करणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. हिंसक निदर्शनांची पाश्र्वभूमी असलेल्या ग्रामीण भागात उंच ठिकाणांवर फौजा तैनात करण्यात आल्या असून, सोमवार- मंगळवारच्या मध्यरात्रीपासून सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थानिक कार्यालयांवर मंगळवारी मोर्चे काढण्याचे आवाहन फुटीरतावाद्यांनी केल्यामुळे लोकांनी मोठय़ा संख्येत एकत्र येण्यावर र्निबध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेलिकॉप्टर्स आणि ड्रोन विमाने नजर ठेवणार असून, काही भागांमध्ये जमाव गोळा झाल्याचे दिसल्यास सुरक्षा दल त्याबाबत आधीच सूचना देईल, असेही सूत्रांनी सांगितले. राज्यात १९९० साली अतिरेकाचा उद्रेक झाल्यापासून ईदच्या दिवशी राज्यात संचारबंदी लागू असण्याची ही पहिलीच वेळ असेल. २६ वर्षांत पहिल्यांदाच इदगाह आणि हजरतबल दर्गा येथे ईदची प्रार्थना होणार नाही. लोकांना स्थानिक मशिदींमध्ये नमाजाची परवानगी दिली जाईल.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती तणावाची असल्यामुळे सर्व दूरसंचार, इंटरनेट व मोबाइल सेवा येत्या ७२ तासांपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश सरकारने यापूर्वीच दिला आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्य़ातील एका पोलीस चौकीवर बाँब फेकल्यामुळे एक नागरिक ठार, तर पोलिसांसह दहाजण जखमी झाले.

लोक ईदनिमित्त खरेदी करत असताना दहशतवाद्यांनी शेरबाग भागातील पोलीस चौकीवर बाँब फेकला. हा बाँब रस्त्यावर फुटल्यामुळे दहा जण जखमी झाले. त्यातील बिलाल अहमद हा नंतर मरण पावला, तर ३ पोलिसांची प्रकृती गंभीर आहे.

चार दहशतवादी ठार

जम्मू : काश्मीरमधील पूँछ जिल्हय़ातील चकमकीत सुरक्षा दलांनी आणखी एका दहशतवाद्यास ठार केले असून, कारवाईत मरण पावलेल्या दहशतवाद्यांची संख्या आता चार झाली आहे. सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने सांगितले, की आणखी एक दहशतवादी मारला गेला असून, कालपासून सुरू असलेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या आता चार झाली आहे. तीन दहशतवादी व एक पोलीस अशा चार जणांचा काल मृत्यू झाला व सहा जण जखमी झाले, त्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश होता. पूँछ शहरात सुरक्षा दले व चार दहशतवादी यांच्यात दोन चकमकी झाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curfew in kashmir valley due to eid
First published on: 13-09-2016 at 01:49 IST