नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची आत्मपरिक्षण बैठक रविवारी झाली. या बैठकीत पक्षनेत्यांनी राहुल गांधी यांनी पुन्हा पक्षाध्यक्षपद स्वीकारावे, असा सूर आळवल्याचे सांगण्यात आले. मात्र, तूर्त तरी सोनिया गांधी यांच्याकडेच अध्यक्षपद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आह़े

बैठकीला उपस्थित काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद पुन्हा स्वीकारावे, यासाठी त्यांना पाठिंबा दर्शवला. २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर वरिष्ठ नेत्यांनी गांधी कुटुंबावर अविश्वास व्यक्त केला नव्हता, किंबहुना कार्यकारी समितीच्या बैठकीपूर्वी गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणे ही एक प्रथाच बनली आहे. या वेळच्या बैठकीपूर्वीही असेच घडले.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर विश्वास दर्शवला. बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राहुल गांधी यांची स्तुती केली. ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक विधानाचा समाचार राहुल घेतात. मोदी यांच्याशी राहुलच दृढपणे लढत आहेत. पंतप्रधानही राहुल यांच्यावर टीकेनेचे आपल्या भाषणाची सुरूवात करतात. याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. म्हणून राहुल यांनी पक्षाची धुरा खांद्यावर घ्यावी, अशी आम्हा सर्वाची इच्छा आहे.’’ उत्तर प्रदेशमध्ये निर्धाराने लढल्याबद्दल गहलोत यांनी पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांचेही कौतुक केले. पक्षाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी गेहलोत यांच्या सूरातसूर मिसळणारा संदेश ट्वीटरवर प्रसारित केला. ‘‘मी पूर्वीही म्हटले होते, की राहुल यांनी पक्षाचे पूर्णवेळ अध्यक्षपद त्वरित स्वीकारावे. माझ्यासारख्या लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांची अशीच इच्छा आहे.’’

युवक काँग्रेसचे प्रमुख श्रीनिवास बी. व्ही. म्हणाले की, गांधी परिवार हा केवळ काँग्रेसच नाही तर देशातील सर्व घटकांना एकत्र बांधणारा धागा आहे आणि तो कोणत्याही निवडणुकीतील विजय किंवा पराभवावर अवलंबून नाही. झारखंड प्रदेश काँग्रेसने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारा ठराव मंजूर केला.

बैठक सुरू असताना कार्यालयाबाहेर जमलेल्या पक्षनेत्या अलका लांबा यांच्यासह नेत्यांनी राहुल यांना नेतृत्व करण्यासाठी पाठिंबा दर्शवणाऱ्या घोषणा दिल्या.

संसद अधिवेशनात विरोधकांच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होईल़  पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात विरोधकांच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आह़े  सरकारविरोधात एकजुटीच्या प्रयत्नांना आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस हे पक्ष अपेक्षित प्रतिसाद देणार नाहीत, असा काँग्रेसच्या काही नेत्यांचा अंदाज आह़े  त्यामुळे विरोधकांची बैठक बोलावण्याआधी चाचपणी करण्यासाठी संबंधित पक्षांशी संपर्क करण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेत्यांवर सोपविण्यात आल्याचे समजत़े

पक्षमजबुतीसाठी सर्व बदल करण्याची सोनियांची इच्छा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सर्व नेत्यांची मते ऐकून घेतली आणि पक्षमजबुतीसाठी आवश्यक ते सर्व बदल करण्याची इच्छा व्यक्त केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत यांनी पक्षाचे ‘चिंतन शिबिर’ राजस्थानमध्ये आयोजित करावे, अशी सूचना बैठकीत केली.