Cyclone Montha: ऑक्टोबरच्या अखेरीस राज्याच्या काही भागात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामाना विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय झाल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय हवामान विभागाने, चक्रीवादळाचा अंदाज वर्तवला असून ओडिशा आणि तमिळनाडूच्या पूर्व किनारपट्टीला दोन दिवस मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा दिला आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात वेगाने वारे वाहत आहेत. याठिकाणी चक्रीवादळ तीव्र झाल्यानंतर त्याला मोंथा असे नाव देण्यात येईल. (मोंथा म्हणजे सुगंधी फूल) यावर्षी भारतीय भूभागावर धडकणारे हे पहिलेच चक्रीवादळ असेल. या महिन्याच्या सुरुवातीला, अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर शक्ती चक्रीवादळ निर्माण झाले होते. परंतु ते भारताच्या किनाऱ्यापासून दूर राहिले होते.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपर्यंत तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात खूप मुसळधार पाऊस (२४ तासांत ११५-२१० मिमी) पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत आंध्र प्रदेश, यानम, तेलंगणा, छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशाच्या किनारी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शनिवारी मिळालेल्या ताज्या उपग्रह प्रतिमा आणि हवामानविषयक अपडेट्सनुसार, बंगालच्या आग्नेय उपसागरात खोल दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. तसेच भारतीय हवामान विभागाने सोमवारी आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवरील काकीनाडा, कोनासीमा, पश्चिम गोदावरी, कृष्णा, बापटला, प्रकाशम आणि एसपीएसआर नेल्लोर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर केला. उत्तर तमिळनाडूमधील तिरुवल्लूर लगतचे जिल्हे आणि ओडिशाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल, असे सांगण्यात आले आहे.
मंगळवारपर्यंत चक्रीवादळाचे तीव्र वादळात रूपांतरित होण्याची आणि २८ ऑक्टोबरपर्यंत आंध्र प्रदेश किनाऱ्याजवळ पोहोचण्याची शक्यता आहे.
मोंथा नाव कसे दिले?
उत्तर हिंद महासागर प्रदेशात वादळांची तीव्रता निश्चित झाल्यानंतर त्यांना नावे दिली जातात. मोंथा हे नाव थायलंडमधून आले आहे. थाई भाषेत त्याचा अर्थ ‘सुगंधित फूल’ असा होतो. चक्रीवादळांना नाव ठेवण्याच्या पद्धतीमुळे संवाद साधणे, नोंदी ठेवणे आणि जनजागृती करण्यास मदत होते.
