अमरावती : आंध्र प्रदेश तसेच ओडिशा किनारपट्टीला ‘मोंथा’ चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे झालेल्या घटनेत आंध्र प्रदेशात दोघांचा मृत्यू झाला, तर अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. तसेच ओडिशातही अनेक भागांत पाऊस झाला. या घटनेमुळे ओडिशातील विविध जिल्ह्यांमध्ये भूस्खलन, झाडे उन्मळून पडली आणि घरांचे नुकसान झाल्याच्या अनेक घटना घडल्या.
या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील ३८,००० हेक्टरवरील उभे पिके आणि १.३८ लाख हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाल्याचे सरकारने सांगितले. कोनसीमा जिल्ह्यातील मकानागुडेम गावात एक ताडाचे झाड उन्मळून पडल्याने एका ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (एपीएसडीएमए) व्यवस्थापकीय संचालक प्रखर जैन यांनी ही माहिती दिली.
वादळ अंतर्वेदीजवळील किनाऱ्यावर आदळले. नुकसान कमी होते, अशी माहिती पश्चिम गोदावरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अदनान नईम अस्मी यांनी दिली. मध्यरात्रीच्या सुमारास पेरुपालेम गावातील समुद्रकिनाऱ्यावरील रस्त्यावर समुद्राचे पाणी पोहोचले होते. दरम्यान, चक्रीवादळानंतर बुधवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
मुख्यमंत्र्यांकडून आढावा
दरम्यान, मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी पाऊस आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे निर्देश दिले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनाचे विशेष मुख्य सचिव जी. साई प्रसाद यांनी दिली. नायडू यांनी बुधवारी सांगितले की, राज्यात मोंथा या तीव्र चक्रीवादळामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच खबरदारीच्या उपायांमुळे नुकसान कमी झाल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. तसेच राज्यातील सर्व यंत्रणांना चक्रीवादळग्रस्तांना अधिक मदत देण्यासाठी आणखी दोन दिवस प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्याचे निर्देशही दिले.
तेलंगणमध्ये मुसळधार
आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर रात्रीतून आलेल्या तीव्र चक्रीवादळ मोंथाच्या परिणामामुळे बुधवारी तेलंगणाच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. तेलंगणात, वारंगल, महाबूबाबाद, यदाद्री भुवनगिरी, जनगाव, सूर्यपेट, नालगोंडा, नगरकुरनूल, सिद्दीपेट तसेच हैदराबादमध्येही पाऊस पडला. दरम्यान, तेलंगणचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी चक्रीवादळाच्या परिणामाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.
