अमरावती, पुरी : आंध्र प्रदेश मोंथा चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ते मंगळवारी दुपारी ते मछलीपट्टणमपासून १०० किमी आणि विशाखापट्टणमपासून २७० किलोमीटर अंतरावर पोहोचले होते. चक्रीवादळ किनाऱ्याला धडकल्यानंतर वाऱ्याचा वेग ९० ते ११० किलोमीटर प्रतितास इतका राहील, असा अंदाज आहे. दरम्यान, किनाऱ्यावरील एका गावात झाड उन्मळून पडलेल्या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला.

चक्रीवादळ धडकण्यापूर्वी किनारी भागात पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. मछलीपट्टणम येथे मंगळवारी दुपारपर्यंत ५.२ मिमी पावसाची नोंद झाली. नरसापूर येथे ९.८ मिमी, काकीनाडा येथे ५.७ मिमी पाऊस झाला. नेल्लोर जिल्ह्यात सोमवारपासून पाऊस पडत आहे.

दरम्यान, मोंथा चक्रीवादळामुळे ३१ ऑक्टोबरपर्यंत पश्चिम बंगालसह किनारी भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दक्षिण आणि पूर्व राजस्थानमध्येही मंगळवारी जोरदार पाऊस झाला. झारखंड आणि तमिळनाडूतही जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

रेल्वे, विमानसेवेला फटका

विशाखापट्टणम विमानतळावरून जाणारी आणि येणारी अशी एकूण ३२ विमाने मंगळवारी रद्द करण्यात आली. विमानतळाचे संचालक एन. पुरुषोत्तम यांनी ही माहिती दिली. चक्रीवादळाच्या काळातील आवश्यक सर्व नियमावलींचे पालन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. विजयवाडा येथून १६ उड्डाणे रद्द करण्यात आली. तिरुपती विमानतळावरून चार उड्डाणे रद्द करण्यात आली. दक्षिण-मध्य रेल्वेने वादळाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आणि मंगळवारी एकूण १२० रेल्वे रद्द केल्या.

संकटकाळासाठी तयारी

– आंध्र प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यात १९ छावण्यांची उभारणी, ७०० लोक छावण्यांमध्ये दाखल

– ओडिशामध्ये दोन हजार संकट निवारण केंद्रांची स्थापना, ११,३९६ नागरिक २०४८ केंद्रांमध्ये दाखल- एनडीआरएफची १० पथके आंध्र प्रदेशात, सहा पथके ओडिशात, तमिळनाडू आणि तेलंगणमध्ये प्रत्येकी तीन पथके, छत्तीसगडमध्ये दोन आणि पुदुच्चेरी येथे एक पथक तैनात

– ओडिशात एसडीआरएफची ३० पथके, अग्निशामक दलाची १२३ हून अधिक पथके तैनात

– केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून रेल्वेच्या तयारीचा आढावा