बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या शक्तिशाली ‘तितली’ चक्रीवादळाने उग्र रूप धारण केलं आहे. याचा फटका आंध्र प्रदेश आणि ओडिशाला बसला असून आज यामध्ये ओडिशातील १२ जणांचा मृत्यू झाला आहे. दरड कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण बेपत्ता आहेत. तर आंध्र प्रदेशातही आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारपासून अत्यंत तीव्र झालेले हे चक्रीवादळ केव्हाही ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या सागरतटाला धडक देईल अशी शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवली होती. ओडिशामध्ये चार जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देऊन जवळपास ३ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. मात्र आता त्यानंतर ही परिस्थिती उद्भवली आहे.

गजपती जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यावेळी बरघरा गावातील काही लोकांनी गुंफेत आसरा घेतला होता. त्याचवेळी दरड कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली आणखीही काही जण दबले असण्याची शक्यता आहे. याठिकाणी मदतकार्य वेगाने सुरु असून येथील नागरिकांना निवारा आणि अन्न या सुविधा पुरविण्यात येत आहेत. येत्या २४ तासांत पश्चिम बंगालमधील किनारपट्टी भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सुरूवातीला १० कि.मी. प्रतितास वेगानं पुढे सकरणाऱ्या या वादळाने बंगालच्या खाडीत अचानक निर्माण झालेल्या वातारणामुळे महाकाय रूप धारण केलं. चक्रीवादळाचा फटका जास्त बसण्याची शक्यता असलेल्या परिसरांमध्ये एनडीआरएफची पथकं आधीच तैनात करण्यात आली आहेत. तर या वादळामुळे ज्या कुटुंबांना फटका बसला आहे त्यांना ३ हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केली.