वायू चक्रीवादळाच्या मुकाबल्यासाठी लष्कर, हवाई दलाची पथके तैनात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वायू चक्रीवादळ गुरुवारी गुजरातच्या काही भागांमध्ये धडकण्याची अपेक्षा असून, त्याच्या परिणामांना तोंड देण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. सागरी किनाऱ्यावरील सुमारे २.१५ लाख लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सौराष्ट्र आणि कच्छ क्षेत्रांतील सखल भागात राहणाऱ्या लोकांचे स्थलांतर करण्यात आल्याचे राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून या भागांतील बंदरे आणि विमानतळांवरील परिचालन स्थगित करण्यात आले आहे.

हवामानविषयक ताज्या अहवालानुसार, ‘अतिशय तीव्र चक्रीवादळात’ रूपांतर झालेल्या वायू चक्रीवादळाने त्याचा मार्ग थोडासा बदलला असून, दक्षिणेकडील वेरावळ आणि पश्चिमेकडील द्वारका या दरम्यानच्या गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर ते गुरुवारी दुपारी धडक देईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे चक्रीवादळ सध्या वेरावळच्या दक्षिणेकडे २८० किलोमीटरवर असून ते उत्तरेकडे प्रवास करून गुरुवारी दुपारी द्वारका आणि वेरावळ दरम्यान गुजरात किनाऱ्यावर धडकण्याची पुरेपूर शक्यता आहे. यावेळी ताशी १५५ ते १६५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि हा वेग ताशी १८० किलोमीटपर्यंत जाऊ शकतो, असे हवामान खात्याने एका निवेदनात सांगितले.

किनाऱ्यावर धडकल्यानंतर हे चक्रीवादळ सौराष्ट्र आणि कच्छच्या समुद्रकिनाऱ्यांना समांतर असा प्रवास करत पुढे सरकेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. या चक्रीवादळाने ‘अतिशय तीव्र’ स्वरूप धारण केल्यामुळे, तसेच धडकल्यानतंर २४ तासांपर्यंत त्याचा प्रभाव कायम राहणार असल्यामुळे  गुजरातच्या १० जिल्ह्य़ांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रत्येकी सुमारे ४५ स्वयंसेवकांचा समावेश असलेली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बचाव दलाची (एनडीआरएफ) ५० हून अधिक पथके राज्यात पाठवण्यात आली आहेत.

किनाऱ्यावरील जिल्ह्य़ांमध्ये मदत व बचाव कार्यासाठी लष्कर, हवाई दल आणि एनडीआरएफ यांची पथके तैनात करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार त्यांची मदत घेतली जाणार आहे. चक्रीवादळ येऊन धडकल्यानंतर शोध व बचावकार्यासाठी तटरक्षक दलानेही जहाजे आणि विमाने तैनात केली आहेत. प्रत्येकी सुमारे ७० जणांचा समावेश असलेल्या लष्कराच्या तुकडय़ा जामनगर, गीर, द्वारका, पोरबंदर, सोमनाथ, मोरवी, भावनगर, राजकोट व अमरेली येथे नेमण्यात आल्या असून, आणखी २४ राखीव तुकडय़ा तयार ठेवण्यात आल्या आहेत.

चक्रीवादळाच्या पाश्र्वभूमीवर पश्चिम रेल्वेने १५ गाडय़ा रद्द केल्या असून, इतर १६ गाडय़ा गंतव्य ठिकाणाच्या आधीच थांबवल्या जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना स्थानिक यंत्रणा वेळोवेळी देत असलेल्या माहितीचे पालन करून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyclone vayu in india
First published on: 13-06-2019 at 00:58 IST