सायरस मिस्त्री यांची सोमवारी टाटा इंडस्ट्रीजच्या संचालकपदावरून हकालपट्टी करण्यात आली. या कारवाईमुळे सायरस मिस्त्री यांचा टाटा इंडस्ट्रीजमधील अध्यक्षपदाचा अधिकारही संपुष्टात आला आहे. टाटा इंडस्ट्रीजच्या समभागधारकांनी सोमवारी झालेल्या एक्स्ट्राऑर्डिनरी साधारण सभेत (ईजीएम) हा निर्णय घेतला. रतन टाटा यांनी गेल्या आठवड्यात टाटा इंडस्ट्रीजच्या समभागधारकांना पत्र लिहून सायरस मिस्त्री यांना पदावरून दूर करण्यासाठी पाठिंब्याची विनंती केली होती. टाटा सन्सचा सायरस मिस्त्री यांच्यावर विश्वास उरलेला नसून त्यांच्याशी असलेले संबंध सातत्याने खालावत चालल्याचे रतन टाटा यांनी पत्रात म्हटले होते. दरम्यान, टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागलेल्या सायरस मिस्त्री यांनी रविवारी समूहावर गंभीर आरोप केले होते. व्हीव्हीआयपींसाठीच्या सुमारे ३६०० कोटी रूपयांच्या हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात टाटा सन्सचे संचालक विजय सिंह यांची महत्वाची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मिस्त्रींच्या कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे हा आरोप केला. २०१०मध्ये ३६०० कोटी रूपयांची व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी ऑगस्टा वेस्टलँडशी झालेल्या करारात संरक्षण सचिव विजय सिंह यांची भूमिका महत्वाची होती.
विजय सिंह यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले असून आपल्या निवृत्तीनंतर या हेलिकॉप्टरचा व्यवहार झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात ४२३ रूपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर १ जानेवारी २०१४ रोजी हा व्यवहार रद्द करण्यात आला होता. या व्यवहारानुसार ३६०० कोटी रूपयांत भारताकडून १२ हेलिकॉप्टर्स खरेदी केली जाणार होती. आपल्याला अध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी रचण्यात आलेल्या कटातही विजय सिंह यांचा मोठा वाटा होता, असा आरोपही सायरस मिस्त्रींनी केला होता. विजय सिंह हे टाटा सन्सच्या नॉमिनेशन समितीचे सदस्य होते. २८ जून २०१६ रोजी त्यांनी सायरस मिस्त्रींच्या कामगिरीचा अहवाल दिला होता. विशेष म्हणजे मिस्त्रींच्या कार्यालयाच्या वतीने जेव्हा पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले. त्याच्या काही वेळापूर्वी टाटा सन्सने पत्रकाद्वारे मिस्त्रींनी टाटा समूहाची दिशाभूल केल्याचा आरोप केला होता.