आंध्र प्रदेशच्या माजी गृहमंत्री पी. सबिता इंद्र रेड्डी व वायएसआर कॉंग्रेस अध्यक्ष जगनमोहन रेड्डी शुक्रवारी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. जगनमोहन रेड्डी यांच्या कडप्पा येथील कंपन्यांमध्ये गैरमार्गाने गुंतवणूक व देवाण-घेवाण झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
जगनमोहन आणि इतरांवर सीबीआयने ८ एप्रिलला दाखल केलेल्या पाचव्या आरोपपत्रामध्ये दालमिया सिमेंट आणि इतर उद्योगांमधील देवाण-घेवाणीवर आक्षेप घेतला होता. या खटल्यातील सर्व १३ आरोपींना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने १४ एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचा हुकूम काढला होता. या तेरा आरोपींमध्ये तत्कालीन गृहमंत्री सबिता, जगनमोहन व इतर उद्योजक होते. सबिता रेड्डी व इतर आरोपी वैयक्तीकरित्या न्यायालयासमोर हजर झाले. मात्र, जगनमोहन सध्या त्यांचा आर्थिक सल्लागार व्ही. विजय साई रेड्डींसह न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. त्याची रवानगी चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत जगनमोहन यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.