Daddy’s Home White House Gave Nickname for President Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नाटोच्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी नुकतेच नीदरलँड्सचा दौरा करून आले. नीदरलँड्सला यावेळी पहिल्यांदाच नाटोची शिखर परिषदे आयोजित करण्याची संधी मिळाली होती. परंतु, या परिषदेत घडलेल्या एका घटनेची जगभर चर्चा होत आहे. नाटोचे प्रमुख मार्क रुटे व ट्रम्प यांची भेट झाली तेव्हा रुटे यांनी ट्रम्प यांचा ‘डॅडी’ असा उल्लेख केला. याबद्दल रुटे यांना प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, “मी ट्रम्प यांना नव्हे तर अमेरिकेला डॅडी म्हणालो”. मात्र, व्हाइट हाऊसने ट्रम्प यांच्या प्रचारासाठी ‘डॅडी’ शब्दाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
व्हाइट हाऊसने एक्स या समाजमाध्यमावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये नाटोच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी नीदरलँड्सला पोहोचलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचे काही फोटो आहेत. यासह डॅडी हे गाणं देखील ऐकायला मिळत आहे. डॅडी’ज होम (वडिलांचं घर) या नावाने व्हाइट हाऊसने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
मी अमेरिकेला डॅडी म्हणालो : मार्क रुटे
नाटोच्या शिखर परिषदेत डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायल-इराणमधील युद्धविरामाबद्दल बोलत होते. त्यावर रुटे हसत हसत म्हणाले, “कधी कधी डॅडींना अशा गोष्टी रोखण्यासाठी कठोर भाषा वापरावी लागते”. यावर रूटे यांना विचारण्यात आलं की तुम्ही ट्रम्प यांना डॅडी म्हणताय का? यावर रुटे यांनी नकार दिला आणि ते म्हणाले, “मी अमेरिकेला डॅडी म्हणालो”.
व्हाइट हाऊसकडून डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार
समाजमाध्यमांवरील ट्रेंड्सचा आधार घेत सतत डोनाल्ड ट्रम्प व अमेरिकेचा प्रचार करणाऱ्या व्हाइट हाऊसने लगेच यासंबंधीच्या पोस्ट करण्यास सुरुवात केली. व्हाइट हाऊसने डोनाल्ड ट्रम्प यांना ‘डॅडी’ असं टोपण नावही देऊन टाकलं आहे. नाटोचे सरचिटणीस रुटे यांनी ट्रम्प यांचा गमतीत डॅडी असा उल्लेख केला होता. मात्र, व्हाइट हाऊसने त्याचा प्रचार सुरू केला आहे. लाईव्ह टीव्हीवर युद्धाबद्दल बोलताना ट्रम्प यांनी काही आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यावरून त्यांना प्रश्न विचारल्यावर मार्क रुटे हसले आणि म्हणाले की कधी कधी डॅडींना कठोर भाषा वापरावी लागते.