दहीहंडी काय ऑलिम्पिक स्पर्धा आहे?

पुनर्विचार याचिका फेटाळल्याने वीस फुटांचेच बंधन

सर्वोच्च न्यायालयाचा सवाल; पुनर्विचार याचिका फेटाळल्याने वीस फुटांचेच बंधन

दहीहंडी जागतिक दर्जाचा खेळ असल्याचा दहीहंडी मंडळांचा युक्तिवाद फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने वीस फुटांपेक्षा जास्त उंचीचे मनोरे उभारण्यास बुधवारी पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला. दहीहंडी काही आलिम्पिक खेळ नाही. त्यातून काय पदक मिळवणार आहात.. अशी टिप्पणी न्यायालयाने केली. न्यायालयाच्या कठोर नकाराने आज (गुरुवार) राज्यभर साजरा होणारा दंहीहंडीचा उत्सव वीस फुटांच्या कमाल मर्यादेत आणि अठरा वर्षांखालील गोविंदांच्या सहभागाविनाच पार पाडावा लागणार आहे.

दहीहंडी साजरी करताना वीस फुटांहून अधिक उंचीचे मनोरे नकोत आणि सहभागी गोविंदांचे वय किमान १८ वर्षे तरी हवेच, असे सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवडय़ातच स्पष्ट केले होते. तरीदेखील मुंबईमधील जयजवान क्रीडा मंडळाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. गोविंदांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी नसेल आणि सुरक्षेचे अन्य निकष पाळू; पण मनोऱ्यांच्या उंचीला वीस फुटांचे बंधन न ठेवण्याची विनंती या मंडळाने केली होती. त्यासाठी उत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी तातडीने सुनावणी घेण्यात आली. युक्तिवादाच्या सुरुवातीलाच दहीहंडी हा जागतिक खेळ असल्याची मखलाशी करण्यात आली, पण न्या. अनिल आर. दवे, न्या. उदय ललित आणि न्या. एल. नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने त्यातील हवा काढून घेतली. अखेरीस जयजवान मंडळाची याचिका फेटाळली. या वेळी महाराष्ट्र सरकारने जयजवान मंडळाची रदबदली करण्याचा प्रयत्न केला. पण खंडपीठाने कोणतीही दाद दिली नाही.

यापूर्वीच्या सुनावणीमध्ये दहीहंडीवर ‘धोकादायक खेळा’चा शिक्का मारण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती आणि स्थानिक यंत्रणेला किमान पंधरा दिवस अगोदर दहीहंडीची सविस्तर माहिती (ठिकाण, वेळ, सहभागी गोविंदांचे वय व पत्ते) देण्याची अट स्थगित करण्याचा दिलासा सर्वोच्च न्यायालयाने मंडळांना दिला होता.

उत्सवाच्या नावाखालील चाललेला धांगडधिंगा रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. व्ही. एम. कानडे आणि न्या. पी.डी. कोदे यांच्या खंडपीठाने ११ ऑगस्ट २०१४मध्ये दहीहंडी मंडळांवर विविध र्निबध लादले होते. त्याविरुद्ध मंडळांच्या वतीने पिंपरीमधील विकास शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष फेरविचार याचिका दाखल केली. त्यावर येत्या ऑक्टोबरमध्ये अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दहीहंडीवर दहशतवादी, समाजकंटकांचे सावट

मुंबई : दहीहंडी सणादरम्यान दहशतवादी हल्ल्याची शक्यता मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने वर्तवली आहे. दहीहंडी फोडण्यासाठी निघणारी मंडळे शहरातील अनेक संवेदनशील विभागातून जात असतात. त्यावेळी या मंडळांवर लक्ष ठेवण्याबरोबरच तणाव निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्याने त्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यंदाच्या दहीहंडीच्या सणावर सर्वोच्च न्यायालयाची नजर असल्याने मुंबई पोलिसांनी मंडळांना नियमभंग करू नये, अशी सक्त ताकीदही दिल्याचे कळते.देशात सणांदरम्यान दहशतवादी हल्ल्याची नेहमीच शक्यता असते. त्यातही मुंबई ही दहशतवाद्यांचे लक्ष्य असते. दहीहंडीपासून शहरातील सणांना सुरुवात होत असून त्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना विशेष शाखेने पोलीस दलाला दिल्या आहेत.  सणाच्या जल्लोशात विनाकारण वाद उकरून काढून तसेच धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य, संदेश, अफवा पसरवून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा व्यक्तींवर वेळेत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टपावर बसून प्रवास करणाऱ्यांवर तसेच दुचाकीवर तिघे जण प्रवास करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

  • गोविंदांकडून नागरिकांवर, खासकरून महिलांवर शेरेबाजी, फुगे, गुलाल फेकण्याचे प्रकार सर्रास घडताना दिसतात. पोलिसांनी त्यावर लक्ष ठेवून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.

१८ वर्षांखालील मुलांवर बंदी

  • दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांमध्ये १८ वर्षांखालील मुलांना सहभागी होण्यास बंदी करणारे स्वतंत्र परिपत्रक महिला व बालविकास विभागाने जारी केले आहे.
  • या पूर्वी १२ वर्षांखालील वयाच्या मुलांना दहीहंडी उत्सवात सहभागी होण्यास मनाई करण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १८ वर्षांखालील मुलांना दहीहंडी खेळण्यास बंदी करण्यात आली. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
  • उच्च न्यायालयाचा आदेश कायम करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १७ ऑगस्ट २०१६ रोजी दिला. त्यानुसार १८ वर्षांखालील मुलांना गोविंदा पथकांमध्ये सहभागी करून घेण्यास मनाई करण्यात आल्याचे महिला व बालविकास विभागाने परिपत्रकात म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाची सरबत्ती..

‘तुम्ही म्हणता हा जागतिक खेळ आहे. मग याचा आलिम्पिकमध्ये समावेश का नाही? या खेळातून कोणते पदक आणणार आहात?,’ अशा प्रश्नांची सरबत्ती सर्वोच्च न्यायालयाने केली.

दहीहंडी आयोजक तसेच मंडळांना याआधीच पोलिसांनी नियमांची चौकट पाळण्याचे आवाहन केले आहे. तशी नोटीसच बजावण्यात आली असून त्याचे पालन व्हावे यासाठी पोलीस प्रयत्नशील राहतील.

– अशोक दुधे, प्रवक्ते, मुंबई पोलीस दल

 

मनसे, शिवसेना शक्तिप्रदर्शन करणार

‘राज्य शासनाने दहीहंडीतील गोविंदांच्या सुरक्षेबाबत वेळीच योग्य धोरण तयार केले नाही. सरकारच्या या पळपुटेपटामुळेच न्यायालयाने उत्सवावर र्निबध घातले’, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केली. दरम्यान, मनसे व शिवसेना या दोन्ही पक्षांनी ठाण्यात या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. राज व उद्धव या दोघांनाही त्यांच्या त्यांच्या पक्षनेत्यांनी ठाण्यात येण्याचे निमंत्रण दिले आहे.

 

दरवर्षीप्रमाणेच सण साजरा करणार – शिवसेना

मुंबई : दहीहंडी उत्सव दरवर्षीप्रमाणेच साजरा होईल, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले असून १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना थरांमध्ये सामील होण्यास मनाई करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे २० फुटांच्या उंचीचे र्निबध काही मंडळांकडून झुगारले जाण्याची शक्यता आहे. हिंदूू धर्मातील सणांवर वारंवार बंधने येत आहेत, असे राऊत म्हणाले.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dahi handi pyramids cannot exceed 20 feet rejects appeal