Daku Dulhan News: उत्तर प्रदेश पोलिसांनी डाकू दुल्हन नावाने प्रसिद्ध झालेल्या एका लुटारू नवरीला तिच्या आठ साथीदारांसह अटक केली आहे. २१ वर्षीय आरोपी तरुणीने नाव बदलून देशाच्या विविध शहरांमध्ये जाऊन लग्न केले होते. त्यानंर लग्नाच्या दिवशी सर्व दागिने, रोकड घेऊन ती पळ काढत असे. ती गुजरातमध्ये काजल, हरियाणात सीमा, बिहारमध्ये नेहा, उत्तर प्रदेशमध्ये ती स्वीटी या नावाने वावरत होती. एवढ्या कमी वयात आरोपीने तब्बल १२ लग्न केली. पण ती काही तासांसाठीच. लग्न होत असताना आरोपी तिथून पळ काढायची. पळण्याची पद्धतही सगळीकडे सारखीच होती. तिचे साथीदार लग्न मंडपातून तिचे अपहरण करत असत.
सदर तरुणीचे खरे नाव गुलशाना रियाज खान असे आहे. उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथील रियाज खान या टेलरशी तिचे लग्न झालेले आहे. लूट केल्यानंतर यातील पाच टक्क्यांचा वाटा गुलशानाच्या नवऱ्याला दिला जातो. लग्न ठरल्यानंतर मांडवातून चार ते पाच जण तिचे अपहरण करायचे. यावेळी तिच्यासह ते सर्व मुद्देमालही पळवायचे. लूट केल्यानंतर गुलशाना आणि तिचे साथीदार पुन्हा नवे सावज शोधत असत.
कशी झाली अटक?
गुरूवारी आंबेडकर नगर पोलिसांनी गुलशाना आणि तिच्यासह आठ साथीदारांना अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षक केशव कुमार म्हणाले की, जवळच असलेल्या कसादाहा गावाजवळ या टोळक्याने एक लूट केली होती, तिथून पळ काढत असताना पोलिसांनी सर्वांना रंगे हात पकडले. अटक झालेल्यांपैकी पाच महिला आणि चार पुरूष आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ७२ हजारांची रोख रक्कम, एक दुचाकी, सोन्याचे मंगळसूत्र, ११ मोबाइल फोन आणि तीन खोटे आधार कार्ड जप्त केले.
उत्तर प्रदेशमध्ये लूट करण्यापूर्वी गुलशाना आणि तिच्या टोळीने हरियाणाच्या रोहतक येथील सोनूला लुटले होते. त्यांच्याकडून ८० हजारांची रोकड लूटली गेली. ज्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीये, अशा कुटुंबांना हेरून गुलशाना आणि तिची टोळी लग्न जमविण्याचा प्रयत्न करत असत.
अटक झाल्यानंतर आरोपींनी कबूल केले की, त्यांनी आतापर्यंत १२ कुटुंबियांची फसवणूक केली आहे. कायद्याच्या कचाट्यात अडकू नये, यासाठी वधू आणि नातेवाईक त्यांची नावे बदलत असत. तसेच बोगस कागदपत्रे तयार करून समोरच्यांचा विश्वास संपादन करत असत. लग्न ठरल्यानंतर या बदल्यात वराकडून विशिष्ट रकमेची मागणी केली जाई. लग्नाच्या दिवशी रक्कम आणल्यानंतर ती घेऊन पोबारा केला जाई.