द कश्मीर फाईल्स चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. हा चित्रपट सध्या बॉक्सऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करतोय. दरम्यान राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात याच चित्रपटाच्या संदर्भात सोशल मीडियावर मत व्यक्त केल्याने एका व्यक्तीला मंदिरात नाक घासून माफी मागायला लावण्यात आलीय. पीडित व्यक्तीचे नाव राजेश कुमार मेघवाल असे असून चित्रपटावर टिप्पणी केल्यानंतर पोस्टवरील कमेंट्सला उत्तर देताना हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. यासंदर्भात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आले आहे.

यासंदर्भातील वृत्त रिपब्लिक भारत या इंग्रजी वृत्त संकेतस्थळाने दिले आहे. रिपब्लिक भारतने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना बोहरोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून मंगळवारी यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये राजेश मेघवाल लोकांच्या दबावाखाली येऊन एका मंदिरात नाक घासताना दिसत होते. त्यांनी दोन ते तीन दिवसांपूर्वी द कश्मीर फाईल चित्रपटासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी द कश्मीर फाईल्स चित्रपटावर टीका केली होती.

या पोस्टवर नंतर अनेक प्रतिक्रिया आल्या. काही लोकांनी प्रतिक्रियेच्या स्वरुपात जय श्री कृष्ण तसेच जय श्री राम असे लिहिले. या कमेंट्सवर अपमानास्पद भाष्य केल्याचा आरोप राजेश मेघवाल यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण चिघळल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर माफी मागितली. परंतु लोकांनी त्यांना मंदिरात येऊन माफी मागण्याची मागणी केली. त्यांनतर मंगळवारी राजेश मेघवाल यांना एका मंदिरात नेण्यात आले. तेथे देखील पीडित व्यक्तीने माफी मागितली. मात्र काही लोकांनी त्यांना मंदिरात नाक घासण्यास भाग पडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच पीडित व्यक्तीचा छळ केल्याप्रकरणी आणखी काही लोकांना अटक करण्यात आलीय, असे बेहरोर येथील मंडळ अधिकारी आनंद कुमार यांनी सांगितले आहे.