झारखंडमध्ये माओवाद्यांनी केलेल्या स्फोटात रेल्वे रुळांचे नुकसान; वाहतूक विस्कळीत

पूर्व मध्य रेल्वेच्या धनबाद विभागातील गोमोह- गया सेक्शनमधून जाणाऱ्या अनेक रेल्वेगाडय़ा रद्द कराव्या लागल्या, किंवा त्यांचे मार्ग बदलावे लागले.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेच्या संशयित सदस्यांनी गुरुवारी मध्यरात्री झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात घडवून आणलेल्या स्फोटात रेल्वे रुळांच्या काही भागाचे नुकसान झाले.

 या स्फोटामुळे हावडा- नवी दिल्ली मार्गावरील रेल्वे सेवा सुमारे सहा तास विस्कळीत झाल्या. संशयित माओवाद्यांनी केलेल्या या स्फोटामुळे रेल्वे रुळांच्या फिशप्लेट्सचे नुकसान झाले. या स्फोटामागे असलेल्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अमित रेणु यांनी सांगितले.

 ही घटना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चिचाकी व कर्माबाद रेल्वे स्थानकांदरम्यान घडल्याची माहिती धनबाद येथील रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ कमांडर हेमंत कुमार यांनी दिली. स्फोटात पॅनेल क्लिपचेही नुकसान झाले.

 या घटनेमुळे पूर्व मध्य रेल्वेच्या धनबाद विभागातील गोमोह- गया सेक्शनमधून जाणाऱ्या अनेक रेल्वेगाडय़ा रद्द कराव्या लागल्या, किंवा त्यांचे मार्ग बदलावे लागले. सकाळी साडेसहा वाजेनंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू झाली, असेही कुमार यांनी सांगितले. ज्या गाडय़ांचे मार्ग बदलावे लागले, त्यात नवी दिल्ली- भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस आणि नवी दिल्ली- सियालदा राजधानी एक्सप्रेस यांचा समावेश होता. धनबाद- डेहरी-ऑन-सोन एक्सप्रेस रद्द करावी लागली. तीन दिवसांपूर्वी माओवाद्यांनी गिरिडीह जिल्ह्यातील सरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन मोबाईल टॉवर आणि पाण्याची टाकी स्फोटाने उडवून दिली होती. शिरावर १ कोटी रुपयांचे इनाम असणारा आपला उच्चपदस्थ नेता प्रशांत बोस ऊर्फ किशन दा याच्या अटकेच्या विरोधात या प्रतिबंधित संघटनेने झारखंड व बिहारमध्ये २४ तासांच्या बंदचे आवाहन केले आहे. झारखंड, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यांतील जाळपोळीच्या शंभरहून अधिक घटनांचा बोस हा सूत्रधार होता. 

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Damage to railway tracks in maoist blast in jharkhand traffic disrupted akp

Next Story
आसाम-अरुणाचल सीमेवर रस्ते बांधकामाच्या वादातून हवेत गोळीबार
फोटो गॅलरी