छत्तीसगडमधील दंतवेडा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात दोन जवानांसह दूरदर्शनच्या कॅमेरामनचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर नक्षलवादी संघटनेने पत्रक काढून स्पष्टीकरण दिले आहे. पोलिसांच्या गाडीत दूरदर्शनचा कॅमेरामन आहे हे आम्हाल माहित नव्हते. आम्ही कधीही पत्रकारांवर हल्ला करत आहे. ते आमचे शत्रू नाहीत तर मित्रच आहेत, असे नक्षलवादी संघटनेने म्हटले आहे. दूरदर्शनच्या कॅमेरामनच्या मृत्यूचे खापर आमच्यावर फोडून पोलीस आमची बदनामी करत आहेत, असा कांगावाही नक्षलवाद्यांनी केला आहे.

छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात मंगळवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) दोन जवान शहीद झाले होते. तर दूरदर्शनच्या एका कॅमेरामनचाही मृत्यू झाला होता. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचाही खात्मा करण्यात आला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी संघटनेने पत्रक काढून स्पष्टीकरण दिले आहे.

भाकप (माओवादी) या नक्षली संघटनेच्या दरभा विभागीय समितीने हे पत्रक काढले आहे. या पत्रकावर साईनाथ याची स्वाक्षरी आहे. यात म्हटले आहे की, राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. खोटी आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल केली जात आहे. दररोज सुरक्षा दलाचे जवान गावांवर हल्ला करतात आणि ग्रामस्थांना मारहाण केली जाते, असा आरोप पत्रकातून करण्यात आला. या निषेधार्थ आम्ही ३० ऑक्टोबरला पोलिसांवर गोळीबार केला होता. यात दोन जवानांसह दूरदर्शनच्या कॅमेरामनचाही समावेश झाला. सुरक्षा दलांसोबत कॅमेरामन आहे हे आम्हाला माहितच नव्हते, असा दावा नक्षलवाद्यांनी केला आहे. दूरदर्शनच्या पत्रकाराच्या हत्येचा उद्देश नव्हता, असेही पत्रकात म्हटले आहे.

कॅमेरामन अच्युतानंद साहूचा मृत्यू ही दु:खद घटना आहे. पत्रकार आमचे शत्रू नाहीत. ते आमचे मित्रच आहेत. पण या घटनेनंतर सत्ताधारी आणि पोलीस नक्षलवाद्यांनी माध्यमांवर हल्ला केला, असा खोटा आरोप केला. आम्ही पत्रकारांना आवाहन करतो की चकमक सुरु असलेल्या भागात पोलिसांसोबत येऊ नये, असेही या पत्रकात म्हटले आहे.