‘जीजेएम’ने पुकारलेला बेमुदत बंद ७२ तासांत मागे घ्यावा, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जीजेएम संघटनेला दिला आहे. दार्जिलिंगच्या डोंगरी भागात शांतता प्रस्थापित करावी यासाठी कोलकाता उच्च न्यायालयाकडून आदेश प्राप्त होताच ममता बॅनर्जी यांनी अधिक कठोर भूमिका घेतली आहे.
गेल्या जवळपास आठ दिवसांपासून आपण खूप सहन केले आहे. आता बस्स झाले, येत्या ७२ तासांत बंद मागे घ्या, कठोर कारवाई करावयास आपल्याला भाग पाडू नका, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिला.
पश्चिम बंगालच्या विभाजनाची शक्यता सपशेल फेटाळताना बॅनर्जी यांनी, दार्जिलिंग हा पश्चिम बंगालचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट करून दार्जिलिंग हे आपले हृदय असल्याचे नमूद केले. धर्माच्या नावावर राज्याचे विभाजन कदापि होणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
जबरदस्तीने बंद पुकारल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि त्यामुळे जीजेएमच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे, असे सांगून बॅनर्जी यांनी, दार्जिलिंगमध्ये जनजीवन सुरळीत करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाकडे अंगुलीनिर्देश केला. बंदबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने आपल्यावर काही घटनात्मक बंधने आहेत, असेही त्या म्हणाल्या.
जीजेएमने बंद मागे घेतल्यास त्यांच्याशी चर्चा करण्यास आपली कोणतीही हरकत नाही, त्यांनी राज्याच्या मुख्य अथवा गृह सचिवांशी संपर्क साधावा. आतापर्यंत आपण २५ वेळा दार्जिलिंगला गेलो आहोत आणि यापुढेही जाऊ, असेही त्या म्हणाल्या.