भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या अंत्ययात्रेला दुपारी तीन वाजता जंतर मंतर येथील त्यांच्या निवासस्थानावरुन सुरुवात झाली. निवासस्थानावरुन अंत्ययात्रा निघण्याआधी सुषमा यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात आले. अंत्ययात्रा सुरु होण्याआधी स्वराज यांना सरकारी मानवंदना देण्यात आली. यावेळी सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल आणि मुलगी बांसुरी कौशल यांनी साश्रू नयनांनी सुषमा स्वराज यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी या बाप लेकीच्या जोडीने सुषमा स्वराज यांना सॅल्यूट करत मानवंदना दिली. शासकीय इतमामामध्ये सुषमा स्वराज यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. सुषमा स्वराज यांचं अत्यंदर्शन घेण्यासाठी जंतर मंतर येथील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते आणि नेत्यांनी गर्दी केली. दुपारी तीन वाजता सुषमा स्वराज यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सुषमा स्वराज यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. यावेळी नरेंद्र मोदी भावूक झालेले दिसले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराजला धीर देण्याचाही प्रयत्न केला. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीदेखील श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले होते. सुषमा स्वराज यांच्या जाण्याने नरेंद्र मोदींना मोठा धक्का बसला आहे. नरेंद्र मोदी श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले असता त्यांच्या चेहऱ्यावरुन हे स्पष्ट जाणवत होतं. त्यांनी ट्विट करत हे आपलं वैयक्तिक नुकसान असल्याचंही सांगितलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले तेव्हा उपराष्ट्रपती वैंकय्या नायडूदेखील त्यांच्यासोबत होते.

मंगळवारी रात्री कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे सुषमा स्वराज यांचे निधन झाले. मंगळवारी रात्रीच त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथेच त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.