राजधानी दिल्लीमध्ये एका धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झालाय. एका मुलीने आपल्या जोडीदाराच्या मदतीने स्वत:च्या आईची हत्या केल्याची माहिती समोर आली असून या हत्याकांडामागे संपत्तीचा वाद कारणीभूत असल्याची माहिती समोर येतेय. आईने संपत्तीचा वाटा देणार नाही अशी धमकी दिल्याने हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. आंबेडकर नगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत हा प्रकार घडला असून या मुलीने गळा चिरुन आईची हत्या केली. या महिलेचा मृतदेह बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला.
पोलीस तपासामध्ये या महिलेची हत्या तिची मुलीनेच एका मित्राच्या मदतीने केल्याचं उघडकीस आलं. पोलिसांनी त्यानंतर या दोघांना अटक केली आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांना सुधा राणी यांचा मृतदेह बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्यांच्या गळ्यावर धारधार हत्याराने वार करण्यात आल्याचं दिसत होती. पोलिसांनी सुधा राणी यांची मुलगी देवयानीची चौकशी केली. मास्क लावलेले काही लोक घरात शिरले आणि त्यांनी आईला धमकी देत पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आईने विरोध केला असता त्यांनी आईच्या गळ्यावर वार करुन चोरी करुन पळ काढल्याची माहिती देवयानीने पोलिसांना घडलेला घटनाक्रम सांगताना दिली.
मात्र पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केली असता त्यांना चोरी आणि लूटमार झाल्याचे कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. मृत महिलेच्या अंगावरील सोनसाखळी आणि बोटांमधील अंगठी तशीच होती. त्यामुळे पोलिसांना मुलीने दिलेल्या जबाबावर विश्वास बसला नाही. त्यांनी देवयानीची कसून चौकशी केली असता तिने गुन्हा कबूल केला. देवयानीचं ग्रेटर नोएडामधील एका व्यक्तीशी लग्न झालं होतं. तिला चार वर्षांचा मुलगाही आहे. मात्र लग्नानंतर मुलगा झाल्यावर पतीसोबतच्या सततच्या भांडणांना वैतागून देवयानीने घर सोडलं आणि ती तिच्या एका मित्रासोबत राहू लागली. मात्र तिची आई नेहमी तिला पतीच्या घरी परत जाण्यास सांगत होती. पतीच्या घरी परत गेली नाहीस तर संपत्तीचा वाटा मिळणार नाही अशी धमकी ती नेहमी देवयानीला द्यायची. याच धमक्यांमुळे देवयानीने तिची हत्या केल्याचं सांगितलं आहे.
आपल्या आईचा काटा काढण्यासाठी देवयानीने तिच्या कार्तिक चौहान नावाच्या मित्राच्या मदतीने आईचा हत्येचा कट रचला. हत्येच्या दिवशी काय घडलं याबद्दल सांगताना देवयानीने, “आपण सर्वांसाठी चहा केला. मात्र आईचा चहा देण्याआधी मी त्यामध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या,” असं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर देवयानीने कार्तिकला फोन करुन घरी बोलवून घेतलं. सुधा राणी यांना झोपेच्या गोळ्यांमुळे गुंगी आलेली असल्याने त्या झोपेत असतानाच कार्तिकने सर्जिकल ब्लेडने देवयानीसमोरच सुधा यांचा गळा चिरला. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा बनाव करण्यासाठी देवयानीने घरातील सर्व दागिणे कार्तिकला दिले. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून सर्व ऐवज जप्त केलाय.