भारतातून पलायन करून दोन दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर देखील दाऊद इब्राहिम हे नाव देशात कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलं आहे. सध्या तुरुंगात असलेले राज्य मंत्रिमंडळातील एक मंत्री नवाब मलिक यांच्या प्रकरणाच्या चौकशीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा दाऊदचं नाव भारतातील राजकीय आणि तपास पथकांच्या वर्तुळात चर्चेत आलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम खरंच जिवंत आहे का? असा प्रश्न काही महिन्यांपूर्वीपर्यंत विचारला जात होता. मात्र, दाऊद इब्राहिम कराचीत असल्याचा खुलासा त्याचा भाचा अर्थात त्याची बहीण हसीना पारकरचा मुलका अलीशाह पारकरनं ईडीसमोर केला आहे. त्यासोबत आता दाऊद दर महिन्याला भावंडांसाठी १० लाख रुपये पाठवत असल्याची बाब देखील समोर आली आहे.

नवाब मलिक प्रकरणात ईडीकडून सध्या खालीद शेख नावाच्या एका व्यक्तीची चौकशी सुरू आहे. दाऊदचा भाऊ इकबाल कासकर हा खालीदच्या भावाचा लहानपणीचा मित्र असल्याचं समोर आलं आहे. तसेच, हसीना पारकरचा ड्रायव्हर सलीम पटेलशी देखील त्याची चांगलीच ओळख होती, असं देखील तपासातून समोर आल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. या वृत्तानुसार दाऊद दर महिन्याला पैसे पाठवत असल्याची माहिती खालीदनं ईडीला दिली आहे.

काय म्हणाला खालीद?

“इकबाल कासकर मला एकदा म्हणाला की दाऊद त्याला त्याच्या माणसांकरवी पैसे पाठवत होता. दर महिन्याला १० लाख रुपये दाऊद पाठवायचा. कधीकधी तो मला नोटांचे मोठमोठाले बंडल देखील दाखवायचा. मला म्हणायचा की है पैसे दाऊदभाईने पाठवले आहेत”, अशी माहिती खालीद उस्मान शेखनं ईडीला दिली आहे.

“कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत”, भाच्याची ईडीसमोर कबुली; म्हणाला, “दाऊदच्या बायकोने…”

आत्तापर्यंत ईडीच्या तपासात इक्बाल कासकर, हसीनाचा मुलगा अलीशाह अशा अनेक साक्षीदारांनी दाऊदविषयी खुलासे केले आहेत. “दाऊद कराचीत राहातो. त्याच्या पत्नीचं नाव मेहजबीन आहे. त्याला पाच मुलं आहेत. त्यातल्या एका मुलाचं नाव मोईन आहे. त्याच्या सर्व मुलींची लग्न झाली आहेत. त्याच्या मुलाचं देखील लग्न झालं आहे”, अशी माहिती दाऊदचा भाऊ इकबाल कासकरनं दिली आहे. इकबाल कासकरला खंडणी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली आहे. १९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अनीस हा देखील पाकिस्तानातच राहात असल्याचं देखील इकबाल कासकरनं तपासात सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दाऊदची पत्नी अलीशाहच्या कुटुंबाच्या संपर्कात!

दरम्यान, हसीना पारकरचा मुलगा अलीशाहनं दाऊदच्या पत्नीविषयी देखील माहिती दिली आहे. “ईद, दिवाळी आणि इतर उत्सवांच्या वेळी मेहजबीन (दाऊदची पत्नी) माझ्या पत्नीला आणि बहिणींना संपर्क करते”, असं अलीशाह म्हणाला आहे.