दाऊदशी झालेल्या कथित संभाषणप्रकरणी हॅकरची याचिका
दाऊद इब्राहिम फोन प्रकरण काही केल्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा पिच्छा सोडत नसल्याचे चित्र आहे. सायबर हॅकर मनीष भंगाळे यांनी खडसे यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली असून खडसे यांना आलेल्या दूरध्वनींच्या तपशिलाची ‘सीबीआय’मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे खडसे-दाऊद फोन प्रकरणाला रविवारी पुन्हा एकदा नवे वळण मिळाले.
सबळ इलेक्ट्रॉनिक पुरावे असतानाही मुंबई पोलिसांनी खडसेंविरुद्ध कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप मनीष भंगाळे याने केला आहे. मनीषने १८ मे रोजी दाऊदच्या कराचीतील घराच्या दूरध्वनीचे तपशील मुंबई पोलिसांना दिले आहेत. ‘‘मी दिलेल्या माहितीतून समोर दिसून येत असलेल्या गुन्ह्य़ाबद्दल कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. उलट काही लोक माझ्याकडील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याचा तसेच माझे ई-मेल्स डिलिट करण्याचा प्रयत्न करीत आहेत’’, असे मनीषने म्हटले आहे.
दरम्यान, मुंबई पोलीस गुन्हे अन्वेशन शाखेने खडसे यांना निर्दोषतेचे प्रमाणपत्र देत सप्टेंबर २०१५ ते एप्रिल २०१६ या कालावधीत संबंधित क्रमांकावर कोणताही दूरध्वनी आला नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्या क्रमांकावरून कोणताही दूरध्वनी करण्यात आला नसल्याचे मुंबई पोलीस दलातील सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एटीएसकडून चौकशी
खडसे यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत प्राथमिक चौकशीत काही तथ्य आढळून आले नाही. मात्र या प्रकरणात अन्य बाजू पडताळण्यासाठी राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली. गृह राज्यमंत्री शिंदे हे एका कार्यक्रमानिमित्त रविवारी पुण्यात आले होते. तेव्हा पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, खडसे यांना जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांच्या अनुषंगाने चौकशीदेखील करण्यात आली; परंतु या चौकशीत काही आढळून आले नाही. खडसे यांनी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दाखविली आहे. या प्रकरणाच्या अन्य बाजू पडताळण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्य दहशतवादविरोधी पथकाकडे या प्रकरणाची चौकशी सोपविण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dawood khadse call link vadodara hacker manish bhangale files pil against eknath khadse
First published on: 30-05-2016 at 01:25 IST